esakal | कोथरूडकरांनी ‘ऑनलाईन’द्वारे दिला सर्कसला आधार !
sakal

बोलून बातमी शोधा

kothrud

कोथरूडकरांनी ‘ऑनलाईन’द्वारे दिला सर्कसला आधार !

sakal_logo
By
मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे : झूम कॉलवर शाळा होऊ शकते तर, रॅम्बो सर्कस का होऊ शकत नाही ? या भूमिकेतून सर्कसमधील कलाकारांना मदत करण्याचा अभिनव उपक्रम कोथरूडमधून नुकताच सुरू झाला आहे. आत्तापर्यंत ऑनलाईन सर्कसचे २३ प्रयोग झाले असून त्याद्वारे प्रत्येक प्रयोगाला ५ हजार रुपयांची मदतही मिळाली आहे.

सर्कसचे प्रयोग गेल्या दीड वर्षांपासून बंद पडले आहेत. रॅम्बो सर्कस आणि त्यातील कलाकारही त्याला अपवाद ठरले नाहीत. मुंढव्यात कसेबसे राहणाऱ्या सर्कसमधील ३२ कलाकारांना जगणंही अवघड होत आहे. ही बाब लक्षात घेऊन भाजपच्या उद्योग आघाडीच्या शहराध्यक्ष अमृता देवगावकर यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हा विषय सांगितला. त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळाल्यावर शालेय विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार सर्कसचे एक तासांचे ऑनलाईन प्रयोग सुरू झाले. त्याला विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे संयोजन समितीचा हुरूप वाढला. रेकॉर्डेड व्हिडीओ व्हॉटसअपच्या ग्रूपमधून व्हायरल होऊ लागले. तसेच प्रत्येक प्रयोगात नाविन्य असल्यामुळे विद्यार्थीही सर्कसच्या नव्या लिंकची वाट पाहू लागले.

आता पुढच्या टप्प्यात रॅम्बो सर्कसचे विदूषक प्रत्येक सोसायटीत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोरंजन करणार आहेत. तर ऑनलाईन सर्कस ही प्रोजेक्टर व स्क्रीनच्या माध्यमातून दाखवली जाणार आहे. कोथरूडमधील स्वप्नशिल्प सोसायटीपासून या उपक्रमाची सुरवात झाली असून विविध सोसायट्या, वस्ती भागात आणि महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनाही दाखविली जाणार आहे. स्वप्नशिल्प सोसायटीत सोमवारी झालेल्या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. त्यांनीही या उपक्रमाचे आवर्जुन कौतुक केले. रँबो सर्कस चे संचालक सुजित दिलीप यांचा यावेळी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संयोजिका शिक्षण समिती अध्यक्ष व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, नगरसेवक दीपक पोटे, जयंत भावे, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, भाजपचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर, स्वप्नशिल्प सोसायटीचे दिलीप देशपांडे, विवेक विप्रदास, प्रशांत भोलागीर, सुभाष झानपुरे, उद्योग आघाडीचे संतोष परदेशी, रामदास गावडे आदी या प्रसंगी उपस्थित होते. स्वप्नशिल्प सोसायटीतर्फे या वेळी विदूषकाला ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली.

loading image
go to top