Kothrud News : शेतीत सोने पिकवायचो, आता नाल्यात किडे शोधतोय; जगण्यासाठी बेरोजगार तरुणाची धडपड

कष्टाचा घाम गाळून शेतीत सोने पिकवणारे आम्ही, आता नाल्यात किडे गोळा करुन गुजराण करतोय.
Balaji Kamble
Balaji KambleSakal

कोथरुड - कष्टाचा घाम गाळून शेतीत सोने पिकवणारे आम्ही, आता नाल्यात किडे गोळा करुन गुजराण करतोय, अशा शब्दात बालाजी बांबू कांबळे, मुळगाव उमरगा, जि. धाराशीव या तरुणाने आपली व्यथा मांडली.

दहावी नापास झालेल्या बालाजीला पुण्यात येवून तीन वर्षे झाली आहेत. नाव बालाजी असले तरी आर्थिक स्थिती बेताचीच. वडील पायांनी अधू आहेत. घरी शेळ्या आहेत. दोन एकर शेतीत राबून दोघा भावांनी सोयाबीनचे पीक घेतले. लागवडीसाठी २५ हजार रुपये खर्च आला. विक्री करायला नेले तेव्हा हातात दहा हजार रुपये पडले. असे असेल तर कसे जगणार. म्हणून गाव सोडून दोघा भावांनी पुण्याची वाट धरली. पुण्यात गाडी चालवायचे काम घेतले. पण ते देखील परवडेना.

बालाजी म्हणाला की, मी शिफ्टने रीक्षा चालवायचो. पण ते देखील परवडत नव्हते. मी जेथे राहतो तेथील एक माणूस नाल्यातील कीडे पकडायचे काम करायचा. हे काम काय आहे हे जाणून घेतले आणि नदी, नाल्यातील ब्लड म्हणून मांशाचे खाद्य असलेले कीडे पकडायचे काम सुरु केले. वर्ष झाले आता मी हेच काम करतो. सकाळी सहा ते अकरा वाजे पर्यंत किडे मारतो.

बालाजीने आपला थोरला मुलगा गावाकडेच शिकायला ठेवलाय. एक मुलगा, मुलगी व पत्नीसह तीन हजार रुपये भाडे असलेल्या पत्र्याच्या खोलीत तो राहतोय. शेती पिकली असती तर त्याला हे काम करायची गरज नव्हती.

बालाजी म्हणतो, हे काम आवडते असे नाही पण पोट भरायचे म्हणून हे काम करायचे.

कधी कधी नदीपात्रात दारु जुगारासाठी आलेल्या लोकांचा त्रास होतो. मारपण खावा लागला. पोट भरायचे असल्यामुळे आम्ही त्यांना काहीही करु शकलो नाही. तेथे जाणे सोडले. या कामाचा फायदा एकच की जेवढी मेहनत करेल तेवढा पगार लगेच भेटतो. शेतीत वर्षभर राबतो पण पैसा मिळेल याची हमी नाही.

प्रजासत्ताक भारत पक्षाचे लक्ष्मण चव्हाण म्हणाले की, ग्रामीण भागाचा योग्य विकास होवू शकला नाही म्हणूनच बालाजी सारख्या तरुणांना गाव सोडून शहराकडे यावे लागते. गावांचा योग्य विकास झाला असता, शेतीचे बिघडलेले अर्थकारण जुळवता न आल्याने स्थलांतर वाढले आहे. विकासाची भाषा बोलणारांनी बेरोजगारीच्या प्रश्नाचा व वाढत्या स्थलांतराचा विचार करावा. अन्यथा जो उद्रेक होईल तो अनेकांना उध्दवस्त करेल.

  • नांदेड सीटी, बावधन, खडकवासला आणि पुणे परिसरातील विविध नाल्यात, मुळा व मुठा नदीत किडे गोळा करतात.

  • जाळी व सळीचा साचा बनवण्यासाठी साधारण पाचशे रुपये खर्च लागतो.

  • बालाजी सारखे ४० हून अधिक लोक या पध्दतीने नाल्यात उतरुन काम करतात.

  • पाणी प्यायचा मोठा जग भरतील एवढे किडे ८० रुपये भावाने घेतात.

  • कीडे चावले तर अंगावर फोड येतात.

  • प्रदुषित, रसायन मिश्रीत पाण्यामुळे त्वचेवर परिणाम.

  • महिन्याला दहा ते बारा हजार पर्यंत उत्पन्न मिळते.

प्यायच्या पाण्यात जशा अळया असतात तशे हे लाल रंगाचे कीडे असतात. त्याला ब्लड म्हणतात. किडे पकडताना अंगाला चिकटले तर ते चावतात. घाण पाणी असतील तेथेच हे कीडे मिळतात. नाल्यात चिखल असल्यामुळे चप्पल घालता येत नाही. त्यात जर काचा असतील तर हात पायाला जखम होते. हातापायाची सालटे निघतात. घरगुती माशांसाठी खाद्य म्हणून या किड्यांच्या गोळ्या बनवतात.

कीडे पकडले की मच्छरदाणीत बांधतात. स्वच्छ पाण्याच्या पिशवीत ठेवतात. त्यामुळे त्या मच्छरदाणीत फक्त किडे उरतात. बाकीचा कचरा टाकून देतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com