कोयता गँगची दहशतीने मांजरीकर धास्तावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

अल्पवयीन मुलांच्या टोळ्यांनी "कोयता गँग' च्या नावाखाली या टोळ्यांनी दहशत माजविली आहे.

Crime News : कोयता गँगची दहशतीने मांजरीकर धास्तावले

हडपसर - रात्री अपरात्री वाहने अडवून लूट करणे, महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावणे, किरकोळ व्यापारी, भाजी विक्रेते, टपरीवाले आदींना कोयता दाखवून दहशत माजवीत, जखमी करीत लुबाडणूक करणे आदी प्रकार गेली काही महिन्यांपासून परिसरात वाढले आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलांच्या टोळ्या सक्रीय असून "कोयता गँग' च्या नावाखाली या टोळ्यांनी दहशत माजविली आहे. या टोळ्यांकडून वारंवार होणाऱ्या अनुचित प्रकारामुळे मांजरीकर धास्तावले असून गावातील नागरिकांनी एकत्रीत हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन दहशतीबाबत लक्ष घालण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.

हडपसर पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या मांजरी बुद्रुक, भेकराईनगर, गंगानगर, काळेपडळ, सातववाडी, गोंधळेनगर, सोलापूर रस्ता, मांजरी-मुंढवा रस्ता, महादेवनगर आदी भागात गेली काही महिन्यांपासून 'कोयता गँग' नावाने ओळखल्या जाणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळक्यांकडून दहशत पसरवली जात आहे. हातात, पाठीवर, कमरेला कोयता लावून ही मुले टोळक्याने वावरत आहेत. कधी हवेत कोयता फिरवत, कधी शिव्या देत तर, कधी वाहने, घरे यांवर दगडफेक करीत दहशत माजवीत आहेत. सोलापूर रस्त्यालगतचे भाजी व फळ विक्रेते, दुकाणदार, व्यापारी यांच्या समोर कोयता दाखवून त्यांच्याकडून पैसे गोळा केले जात आहेत. न दिल्यास मारहाण व मालाचे नुकसान केले जात आहे. रस्त्याने ये-जा करणारी वाहने व पादचारी यांना कोयत्याचा धाक दाखवून लूटमार केली जात आहे.

मांजरी परिसरात गेल्या आठवड्यात कोयत्याने धाक दाखवून दागिने हिसकवण्याचा तसेच जाब विचारला म्हणून घरावर दगडफेक करण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे गावातील शेकडो नागरिकांनी आज (ता. १२) हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन सामुहिक तक्रार दिली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनाही त्याबाबत निवेदन पाठविण्यात आले आहे.

'परिसरातील अशी विधीसंघर्षीत सत्तर मुले आहेत. त्यांना वेळोवेळी ताब्यात घेऊन समज दिली जात आहे. त्यांच्या पालकांशीही संपर्क साधून समुपदेशन केले जात आहे. दहशत माजविणाऱ्या अशा टोळ्यांवर कायद्यानुसार कारवाईही केली जात आहे. यापुढेही दहशत माजविणाऱ्या अशा टोळ्यांविरोधात कारवाई केली जाईल.'

- अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस ठाणे