

नवी दिल्ली : नाना पाटेकर यांच्या चित्रपट कारकिर्दीत ‘क्रांतिवीर’ हा महत्त्वाचा गाजलेला चित्रपट आहे. यामध्ये त्यांनी साकारलेल्या ‘प्रताप नारायण तिलक’ या बंडखोर, अन्यायाची प्रचंड चीड असलेल्या, समाजाच्या चुका भेदक शब्दांत मांडणाऱ्या रांगड्या तरुणाची भूमिका चित्रपट रसिकांनी डोक्यावर घेतली होती. त्यातील त्यांची शब्दफेक अत्यंत प्रभावी ठरली. त्यातील त्यांचे संवाद आजही अनेकांना लक्षात आहेत. अभिनयसम्राट दिलीपकुमार यांनीही हा चित्रपट पाहिल्यावर ‘क्रांतिवीर’ हा शब्द नाना पाटेकर यांच्याशी कायमस्वरूपी जोडला जाईल, असे भाकीत केले होते.
‘क्रांतिवीर’ चित्रपटाला दोन वर्षांपूर्वी तीस वर्षे पूर्ण झाली. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी दिलीपकुमार यांची ही आठवण सांगितली. ‘‘सुनील दत्त यांच्या ‘अजंता आर्ट्स’मध्ये झालेल्या ‘क्रांतिवीर’च्या ट्रायलला दिलीप साहेब, सायरा बानू जी आणि माझे काही कुटुंबीय हजर होते. ही ट्रायल जेव्हा संपली, तेव्हा दिलीप साहेब गृहामधून बाहेर आले आणि नर्गीस यांचे छायाचित्र लावलेल्या भिंतीशेजारील एका खुर्चीवर बसले. ते काय म्हणतील, याचा मी विचार करू लागलो. ते मला म्हणाले,की तू असा काही चित्रपट बनवला आहेस की त्याचा प्रभाव चांगलाच जाणवतोय. ‘मदर इंडिया’ची ट्रायल पाहिल्यावर याच खुर्चीवर बसून मी नर्गीसला म्हटलं होतं की तू इथून पुढे कितीही काम केलं तरी ‘मदर इंडिया’ हे नाव तुला कायमस्वरूपी चिकटून राहिल. नानाला सांगा, त्याने पुढे कितीही काम केलं तरी ‘क्रांतिवीर’चं लेबल त्याला कायम चिकटून राहिल. दिलीपकुमार यांनी चित्रपटाचे खूप कौतुकही केल्याचे मेहुल कुमार यांनी एका यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
विशेष म्हणजे, नाना पाटेकर यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून एकच फिल्मफेअर पुरस्कार मिळाला, तो ‘क्रांतिवीर’साठीच ! आणि हा पुरस्कार त्यांना मिळाला तो दिलीपकुमार यांच्या हातून ! नंतर दिलीपकुमार यांनी नाना पाटेकर यांना त्यांच्या घरी निमंत्रित केले होते. एका मुलाखतीवेळी या घटनेची आठवण सांगताना नाना पाटेकर म्हणाले,‘‘दिलीपकुमार यांच्यासारख्या महान कलाकाराची भेट झाल्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो. त्यांनी मला घरी बोलावले तेव्हा प्रचंड पाऊस कोसळत होता आणि पूर्ण भिजलो होतो. मला या स्थितीत पाहिल्यावर दिलीपकुमार यांनी पटकन टॉवेल आणून दिला. नंतर त्यांचा एक कुर्ताही मला घालायला दिला.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.