

कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू
शेतकरी सुखावले ः सभापती शिंदेंच्या पुढाकाराला यश
मिरजगाव, ता. ५ ः कुकडी डाव्या कालव्याच्या रब्बी हंगाम २०२६-२७ मधील आवर्तनास गुरुवारी (ता. ५) सायंकाळी ४ वाजता प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. कालव्यातून सुरुवातीला ५०० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारामुळे हे आवर्तन सुरू झाल्याने शेतकरी सुखावले आहेत.
रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेत पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी सभापती प्रा. शिंदे यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. शेतीच्या दृष्टीने रब्बी हंगामातील पाण्याचे आवर्तन अत्यंत महत्त्वाचे असते. विशेषतः ज्वारी, गहू, हरभरा, तसेच इतर रब्बी पिकांच्या पेरणीपासून ते पिकांच्या वाढीच्या अवस्थेपर्यंत पाण्याची आवश्यकता असते. पावसाच्या अनिश्चिततेमुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी कालव्याचे आवर्तन वेळेत सुरू होणे, ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.
कर्जत, जामखेड आणि करमाळा तालुक्यांतील अनेक गावांमधील शेती कुकडी डाव्या कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे या आवर्तनाचा लाभ मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना होणार आहे. पाणी उपलब्ध झाल्याने रब्बी पिकांच्या सिंचनाचे नियोजन करणे शक्य होणार असून, शेतीच्या उत्पादनाला आधार मिळणार आहे. विशेषतः कमी पर्जन्यमान आणि पाण्याच्या मर्यादित उपलब्धतेमुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे.
------------
समान पद्धतीने पाणी उपलब्ध व्हावे
कर्जत, जामखेड आणि करमाळा तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी हे महत्त्वाचे पाऊल पडले आहे. दरम्यान, कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेवटच्या टोकापर्यंतच्या शेतकऱ्यांना नियोजनानुसार आणि समान पद्धतीने पाणी उपलब्ध व्हावे, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. रब्बी हंगामाच्या तोंडावर पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.