

कुंभारी टोल नाक्याजवळ कंटेनरची ट्रकला धडक
चालक गंभीर जखमी; सूचना फलकांच्या अभावामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त
सकाळ वृत्तसेवा
दक्षिण सोलापूर, ता. १९ : कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील टोल नाक्याजवळ सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. टोल भरण्यासाठी थांबलेल्या ट्रकला मागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने कंटेनर चालक गंभीर जखमी झाला. अपघाताचा आवाज मोठा असल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १९ झेड १५३२ क्रमांकाचा ट्रक टोल भरण्यासाठी उभा होता. त्यावेळी मागून भरधाव वेगाने आलेला एमएच १२ व्हीटी ०९७३ क्रमांकाचा कंटेनर थेट ट्रकवर आदळला. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कंटेनरच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. तसेच चालक केबिनमध्ये अडकून पडला. या घटनेची माहिती मिळताच टोल नाक्यावरील कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यांनी चालकाला केबिनमधून बाहेर काढले. त्यानंतर जखमी चालकाला तातडीने ॲम्ब्युलन्समधून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता.
दरम्यान, अपघातानंतर नागरिकांनी टोल प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. सोलापूर-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावर टोल नाका सुरू होण्यापूर्वी सुमारे अडीचशे मीटर अंतरावर ‘पुढे टोल नाका आहे’ असा कोणताही सूचना फलक नसल्याने वाहनचालकांना अचानक टोल नाका दिसतो. त्यामुळे वेग नियंत्रणात आणताना अपघात होण्याची शक्यता वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी टोलपूर्व सूचना फलक, रिफ्लेक्टर, स्पीड ब्रेकर आणि इशारा दिवे तातडीने बसवावेत, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.