Pune News : कुपवाडा ते पुणे व्हाया क्रिकेट

कुपवाडा जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमधून इयत्ता ८ वी ते पदवीचे शिक्षण घेणाऱ्या १६ मुली पुण्यात आल्या आहेत.
Jammu kashmir girls cricket team
Jammu kashmir girls cricket teamsakal

फक्त १२ वर्षांची आयमन लोलाबमधून पुण्यात पोहोचली आहे. तिच्यापेक्षा एखादं दुसऱ्या वर्षाने मोठी मारिया कुपवाडाची. सोगाम, विलगाम, कालारूस, हंदवारा - ऐकली आहेत नावं? बहुतेकांनी ऐकली नसतील. पण ९० च्या दशकात जम्मू- काश्मीरमधून येणाऱ्या बातम्या ऐकणाऱ्या सर्वांना ‘कुपवाडा’ हे नाव चांगलेच परिचित असेल.

तरुणांची माथी भडकवून हिंसाचाराला खतपाणी घालणाऱ्या या काळात कुपवाडाचा भूगोल भारतविरोधी कारवायांसाठी वापरला गेला. एकेकाळी शेती आणि व्यापारामुळे संपन्न असलेला हा भाग इतिहासातील अंधाऱ्या काळाचा साक्षीदार बनला. या काजळीला दूर करण्यासाठी काही वेळा बळाचा तर काही वेळा मायेचा, आपुलकीचा वापर करावा लागला. विविध प्रयत्नांनी अंधाराला सरावलेल्या डोळ्यांना प्रकाशाची आस लागली आणि बदलाच्या पर्वाला सुरुवात झाली.

२००२ मध्ये काश्मीर खोऱ्यात काम चालू होताना आमची ओळख याच भागाशी प्रथम झाली. आम्हाला तेव्हा ‘असीम फाउंडेशन’ हे नाव मिळायचे होते. या काळात येथील शाळांमध्ये, विद्यार्थी- शिक्षकांमध्ये आणि गाव-गावांमध्ये काम करताना अडचणींना बगल देत मिळालेली स्थानिकांची साथ आम्हाला काश्मीरचा एक वेगळा चेहरा दाखवणारी होती.

या भागांतील शाळांना भेटी देणे, तेथे संगणक प्रशिक्षण, विज्ञान केंद्रे सुरू करणे, राज्यस्तरीय विज्ञान प्रश्नमंजूषा आणि स्थानिक शाळांसाठी विज्ञान शिबिरांचे आयोजन अशा विविध प्रकल्पांमधून कुपवाडाची ओळख दिवसेंदिवस प्रगतीची आणि विकासाची होत होती. मात्र, आजच्या गोष्टीबद्दल लिखाण करत आहे त्याचे महत्त्व आणखी मोठे आहे.

कुपवाडा जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांमधून इयत्ता ८ वी ते पदवीचे शिक्षण घेणाऱ्या १६ मुली पुण्यात आल्या आहेत. जमीला, नुसरत, सादिया, आफरीन, सोफी, मेहविश, शाहिस्ता आणि त्यांच्या बाकी मैत्रिणी. या सर्वांना कुपवाडा ते पुणे असे २२००-२३०० किलोमीटरचे भौगोलिक अंतरच पार करायचे नाही तर या दोन भागांमध्ये एकमेकांबद्दल असलेल्या समज - गैरसमजांच्या दरीला ओलांडायचे आहे.

पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या ‘क्रिकेट’ या खेळात ‘एक संघ’ म्हणून काहीतरी करून दाखवायचे आहे. खेळाने मने जोडता येतात, यावर आमचा मनापासून विश्वास आहे. आपापल्या गावांमधून, वैविध्यपूर्ण पार्श्वभूमीतून या १६ मुलींना एकत्र बांधणारा धागा म्हणजे क्रिकेट आणि या धाग्यात त्यांना ओवणारे हात म्हणजे भारतीय सैन्यदलाचे - ‘कुपवाडा वॉरिअर्स आणि ‘असीम फाउंडेशन’!

कुपवाडा हे जिल्ह्याचे ठिकाण- या ठिकाणापासून अनेक किमी दूर राहणाऱ्या या मुली कौटुंबिक, सामाजिक (आणि मानसिकसुद्धा) मर्यादांना ओलांडून एका अविस्मरणीय भेटीचा भाग बनण्यास येत आहेत. त्या बाहेर फिरतील, आपल्या सर्वांना भेटतील तेव्हा त्यांच्या मनातील प्रतिमा अधिक स्वच्छ आणि शुभ्र होतील.

आपण या दौऱ्यामध्ये येऊन काय केले, हे जेव्हा त्या आपल्या घरच्या सदस्यांना आणि मित्र- मैत्रिणींना सांगतील तेव्हा एकामुळे किमान १० जण उर्वरित भारताशी एका पातळीवर जोडले जातील. म्हणूनच १६ ते २३ डिसेंबर दरम्यान क्रिकेट प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये माहिती आणि कृतीपर सत्रे, खेळाडूंच्या भेटी सराव सामने आणि प्रदर्शनीय मैत्री सामना याबरोबरच पुणे आणि परिसरातील प्रेक्षणीय ठिकाणांना भेटी, मुंबईची सफर आणि कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर मजा अशी योजना असेल. दि. २१ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता आयसर- पुणेच्या मैदानावर प्रदर्शनी सामना असेल.

बदलत्या भारताचा - बदलत्या काश्मीरचा चेहरा घडवण्यासाठी या संवादाच्या मार्गावर जाणारी वाट आपल्यासमोर खुली आहे. या संवादाशिवाय विश्वास, आपुलकी आणि मैत्री अशक्य आहे आणि ते नसेल तर एकसंधता आणि एकात्मता अशक्य आहे. ओळखीचे एक छोटेसे हसू, काळजीचा एक छोटासा प्रश्न आणि मैत्रीचे एक छोटेसे पाऊल अनेक मोठ्या आव्हानांना पार करू शकते. संधी आपल्या दाराशी आहे - तुम्ही तयार आहात ना?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com