कुणी काम देता का काम? कोरोनाची झळ बसलेल्या 'या' मजुरांना कुणी काम देता का?

सुषमा पाटील
Thursday, 23 July 2020

गणेशनगर, जुना मुंढवा रोड येथील मजूर अड्ड्यावर हा प्रकार दररोज पाहायला मिळतोय.

रामवाडी (पुणे) : "साहेब मी तुमचं काम करतो, मला काम द्या", असं म्हणत प्रत्येक जण त्या व्यक्तीच्या समोर उभे राहून त्याच्याकडे कामाविषयी विचारपूस करतो. पोटासाठी काम शोधतांना त्यांना सोशल डिस्टन्सिंगचा देखील विसर पडतो. आज काम मिळाले, तर संध्याकाळी पोर-बाळांना पोटभर खाऊ घालता येईल. या अपेक्षेपोटी कामाच्या प्रतीक्षेत हे मजूर दुपारपर्यंत वाट पाहतात. मिळालं तर काम, नाहीतर निराश होऊन घरी परतायचं. हा त्यांचा नित्यक्रम गेल्या चार महिन्यांपासून सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 
गणेशनगर, जुना मुंढवा रोड येथील मजूर अड्ड्यावर हा प्रकार दररोज पाहायला मिळतो. मार्च महिन्यापासून कोरोनाची झळ सर्वाधिक या मजुरांना बसत आहे. विदर्भ व कर्नाटकातून आलेल्या मजूर महिला सकाळी आठ वाजेपासून दुपारी बारापर्यंत हाताला काम मिळेल, याची वाट पाहत उभ्या असतात. पूर्वी गवंड्याच्या हाताखाली काम करणे, माळीकाम, एखाद्या घरात धुणीभांडी करणे, अशा स्वरूपाची कामे मिळत होती. परंतु, कोरोनामुळे कोणतंच काम मिळत नाही. त्यामुळे संसाराचा गाडा चालवायचा कसा, ही चिंता या मजूर महिलांना सतावत आहे. सरकारने आम्हाला काम द्यावे, नाहीतर अर्थिक मदत तरी करावी, अशी मागणी या महिलांनानी केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मी नांदेडहून आलीय. बोराटे वस्तीत राहते. घरात लहान मुलं आहेत. त्यांच्या खाण्या-पिण्याचा व औषधांचा खर्च भागवायचा कसा, हा प्रश्न पडला आहे. गेल्या चार महिन्यांपासून घरभाडं थकलंय, काय करावं सुचत नाही. सरकारने आम्हा मजुरांना काम दिलं, तर घरखर्चासाठी थोडेफार पैसे तरी मिळतील.
- कविता नरनाळे, नांदेड 

Edited by : Shivnandan Baviskar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: labor searching of work ganesh nagar, old mundhawa road pune