esakal | हाताला नाही काम, तरी मिळाले दाम! मजुरांना प्रत्येकी पाच हजारांची मदत

बोलून बातमी शोधा

Labour
हाताला नाही काम, तरी मिळाले दाम! मजुरांना प्रत्येकी पाच हजारांची मदत
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनामुळे गेल्या वर्षी लागू करण्यात आलेला लॉकडाउन आणि यंदाच्या कडक निर्बंधांमुळे राज्यात अनेक मजुरांनी त्यांचा रोजगार गमावला आहे. मात्र, यासर्वांत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी असलेल्या विविध प्रकारच्या कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या मदतीचा काहीसा दिलासा मिळाला आहे. मार्च अखेरीपर्यंत मंडळाकडून नऊ लाख ९७ हजार कामगारांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली आहे.

रोजगार गमावलेल्या मजुरांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी त्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये मदत जमा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी १८ एप्रिल २०२० रोजी घेतला होता. त्यानुसार २१ एप्रिलपासून वाटप सुरू झाले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात तीन हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता. पहिल्या टप्प्यात सुमारे सव्वानऊ लाख मजुरांना १८३ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

मार्चअखेरपर्यंत ९ लाख ९७ हजार मजुरांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. नोंदणीसाठी काही अर्ज प्रलंबित असून त्यांची छाननी झाल्यानंतर त्यांना देखील मदत दिली जाणार आहे. नुकत्याच जाहीर केलेल्या मदतीचे वाटप करण्यात लवकरच मंजुरी मिळू शकते.

- एस. सी. श्रीरंगम, सचिव, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार

हेही वाचा: तरूणाचा अनोखा विक्रम; सोळा वेळेस रक्तदान आणि आता प्लाझ्मा दान

दीड हजारास लवकरच मंजुरी

मदतीचा तिसरा टप्पा म्हणून नोंदणीकृत मजुरांना प्रत्येकी दीड हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. या रकमेच्या वाटपास येत्या दोन ते तीन दिवसांत मंजुरी मिळू शकते. मजुरांना लवकर मदत मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली.

मंडळातील कोट्यवधी रुपयांच्या निधीतील काही भाग आमच्या उपयोगास आला, याचा आनंद आहे. मात्र, पाच हजार रुपयांमध्ये गुजराण करणे कठीण आहे. त्यामुळे मंडळाने प्रत्येक सदस्याला किमान पंधरा हजार रुपयांची मदत करणे आवश्यक आहे. तसेच आमचा विमादेखील काढावा. तसेच नुकतीच जाहीर करण्यात आलेली मदत लवकरात लवकर जमा व्हावी.

- शंकर पुजारी, बांधकाम मजूर

  • १८,७५,५१० - नोंदणीकृत मजूर

  • ११,९२,४७४ - नोंदणीकृत सक्रिय मजूर

  • ५,००० (प्रत्येकी) - मदत म्हणून वाटप झालेली रक्कम

  • सुमारे ९ हजार कोटी - मंडळाकडे जमा रक्कम

  • १,५०० - तिसऱ्या टप्प्यात देण्यात येणारी रक्कम (प्रत्येकी)

  • २०,२८,९०३ - मंडळाच्या योजनांचा लाभ घेतलेले मजूर