वायसीएम रक्तपेढीत प्लाझ्मा नव्हे तर चक्क किटचा तुटवडा

सुवर्णा नवले
Monday, 17 August 2020

-वायसीएम रक्तपेढीत प्लाझ्मा कीटचा तुटवडा.

-प्लाझ्मा नव्हे तर चक्क किटचा तुटवडा.

-पाचशे किटची गरज : अफेरेसिस प्लाझ्मा स्वयंचलित मशिनचीही आवश्‍यकता

पिंपरी : एकीकडे प्लाझ्मादानासाठी पुढे येण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून केले जात आहे. मात्र, दुसरीकडे वायसीएम रक्तपेढीत चक्क प्लाझ्मा नव्हे, तर प्लाझ्मा किटचा तुटवडा जाणवत आहे. प्लाझ्मादात्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सध्या पाचशे प्लाझ्मा किटची गरज असून, रक्तपेढीत अवघे 18 कीट शिल्लक राहिले आहेत. कीटच्या पुरेशा साठ्याची मागणी दात्यांसह लाभार्थ्यांनी केली आहे. कोरोना अत्यवस्थ रुग्णांच्या तुलनेत ऐनवेळी किटचा पुरवठा अपुरा पडत असल्याचे निदर्शनास आले आहे.

आणखी वाचा - शरद पवार म्हणाले, काळजी करू नका; मी तुमच्या पाठिशी

पिंपरी-चिंचवड शहरात प्लाझ्माची नितांत वेळोवेळी गरज भासत आहे. दोन महिन्यांपूर्वी प्लाझ्मा किटची किंमत आठ ते साडे आठ हजार होती. ती आता अकरा हजार रुपयांवर गेली आहे. कीटही महागल्याचे दिसत आहे. प्लाझ्मा कीट रक्तपेढीत साचवून ठेवले जाऊ शकतात. दहा दिवसांपूर्वी अवघे दोन ते तीन कीट रक्तपेढीत शिल्लक होते. सुरुवातीला किटची कमतरता भासत नव्हती. मात्र, कोरोनाची लाट आल्याने आता रक्तपेढीत किटचा साठा अपुरा पडत आहे. सध्या एकाच रक्तगटाचा दाताही वेळेत मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे ऐनवेळी रुग्णांच्या नातेवाइकांना धावपळ करावी लागत आहे. त्यात आता कीटसाठी वाट पहावी लागेल की काय या भीतीने नातेवाइकांच्या अंगावर काटा उभा राहत आहे.

वैद्यकीय शिक्षण संचनालयाने खासगी दवाखान्यांकडून एका प्लाझ्मा किटसाठी सात हजार रुपये घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत महापालिकेने सरकारी रक्तपेढींना हे दर आकारण्याचे अधिकार दिलेले नाहीत. तसे आम्ही वायसीएम प्रशासनाला सुचविले आहे. सरकारी रक्तपेढीला या निधीचा उपयोग होऊ शकेल. मागील वर्षी आम्ही केवळ शंभर कीट मागविले होते. गरज पडत नव्हती. मात्र, आता कोरोनामुळे दिवसभरात कधीही कमी जास्त किटची गरज लागू शकते. सध्या पाचशे किटची मागणी केली आहे. त्यातील आतापर्यंत 150 कीट आल्याचे रक्तपेढी प्रमुख तुषार पाटील यांनी सांगितले.

एकाच अफेरेसिस स्वयंचलित मशिनवर काम
प्लाझ्मा अफेरेसिसची स्वयंचलित एकच मशिन रक्तपेढीत आहे. एका दात्याचे दान झाल्याशिवाय दुसऱ्या दात्याला प्लाझ्मादान करता येत नाही. त्यामुळे दिवसभर दात्याला रक्तपेढीत ताटकळत बसावे लागत आहे. एका रुग्णाचा प्लाझ्मा जमा करण्यासाठी तीस ते चाळीस मिनिटांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे दात्याची आणि प्लाझ्मा घेणाऱ्यांची वेळेअभावी तारांबळ उडत आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्लाझ्मा किटचा अखंडित पुरवठा सुरू आहे. कीट अपुरे पडणार नाहीत, याची दक्षता घेतली जात आहे. तीन ते चार दिवसांत कीट उपलब्ध होतील. - मंगेश चितळे, सहायक आयुक्त, भंडार विभाग

आकडे बोलतात...
दिवसाला प्लाझ्मादान ः 7 ते 8
आत्तापर्यंत प्लाझ्मादान ः 132
पहिल्या टप्प्यात आलेले कीट ः 150
एका किटची किंमत ः 11,338 रुपये
शिल्लक किट ः 18

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lack of plasma kit in YCM blood bank