

‘लाडकी बहीण’चा आकडा पडताळलेला
----
मुख्यमंत्री फडणवीस ः सत्तेत असेपर्यंत लाडक्या बहिणींना लाभ देण्याची ग्वाही
-----
ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थींचा समोर आलेला आकडा शंभर टक्के पडताळलेला आहे. नियमबाह्य पद्धतीने लाभ घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल; मात्र पात्र बहिणींना सरकार सत्तेत असेपर्यंत योजनेचा लाभ मिळत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. २०) माध्यमांशी बोलताना दिली.
फडणवीस म्हणाले, ‘‘लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या पडताळणीसाठी ई-केवायसी महत्त्वाचा मुद्दा होता. योजना सुरू केल्यानंतर मोठ्या संख्येने लाभार्थी असल्याने दोन-चार महिन्यांत तपासणी करणे शक्य नव्हते. त्यानंतर करण्यात आलेल्या पडताळणीत १ कोटी ६५ लाख महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली असून, त्यांना कोणताही खंड न पडता योजनेचा लाभ मिळत आहे. नियमांच्या बाहेर राहून लाभ घेणाऱ्यांनी ई-केवायसी केले नाही. काही महिलांच्या लक्षात आले की, त्या आयकर भरत असल्याने योजनेसाठी पात्र नाहीत. काही ठिकाणी पुरुषांनी लाभ घेतल्याचे, तर काही सरकारी कर्मचारी असल्याचेही आढळले. संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.’’
लाडकी बहीण योजनेवरून काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेवरही त्यांनी निशाणा साधला. योजनेच्या विरोधात न्यायालयात गेलेले आणि त्यावेळी योजनेवर टीका करणारेच आता सहानुभूती दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘वंदे मातरम्’बाबत काँग्रेसने घेतलेला ठराव हा संविधानविरोधी असल्याचे फडणवीस म्हणाले. आता देशात इंग्रजांचे राज्य नसून, भारतीय संसदेने घेतलेला निर्णय संविधानिक असतो. संसदेने घेतलेला निर्णय मान्य करणार नसल्याची भूमिका म्हणजे मानसिक गुलामीची परंपरा कायम ठेवण्यासारखी असल्याची टीका त्यांनी केली. केंद्रीय मंत्र्यांनी विद्यापीठांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. विद्यापीठे ही भविष्य घडविणारी केंद्रे आहेत. शासन काय करीत आहे, देशाची आणि जगाची दिशा काय आहे, याची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास अशा संवादाचा उपयोग होईल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षाही मंत्र्यांना समजतील, असे ते म्हणाले.
राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, की त्यांनी सरसकट तरुणांशी संवाद साधला असता तर अधिक आनंद झाला असता. आपल्या माहितीनुसार काँग्रेस नेत्यांच्या नियंत्रणातील महाविद्यालयांतील विद्यार्थिनींची नोंदणी करून त्यांनाच कार्यक्रमाला आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, त्या मुलीही आपल्याच असल्याचे त्यांनी नमूद केले.
कोरोनामुळे एकल झालेल्या
मातांच्या पुनर्विवाहाची जबाबदारी
कोरोना काळात कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबांसाठी संकल्प करण्यात आला होता. त्यातून २९३ कुटुंबांची नोंद झाली. त्यापैकी १०० मुलींचे पालकत्व आपण स्वीकारले होते. संदीप जोशी यांनी या कुटुंबांकडे लक्ष दिले. त्यापैकी एका एकल मातेचा आज विवाह झाला. पुढील काळात जवळपास ३०० मुलींचे विवाह होईपर्यंत ही जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. कमी वयात मोठ्या संकटाला सामोरे गेलेल्या या मुलींच्या आयुष्यात आता स्थैर्य येत असल्याचे समाधान असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.