esakal | बारामती-फलटण रेल्वेमार्गाची भूसंपादन प्रक्रीया रखडली
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती-फलटण रेल्वेमार्गाची भूसंपादन प्रक्रीया रखडली

महत्वाकांक्षी बारामती-फलटण रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचे काम विविध कारणांमुळे गेल्या अडीच वर्षांपासून मार्गी लागत नसल्याने हा प्रकल्प कमालीचा रखडला आहे.

बारामती-फलटण रेल्वेमार्गाची भूसंपादन प्रक्रीया रखडली

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : महत्वाकांक्षी बारामती-फलटण रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचे काम विविध कारणांमुळे गेल्या अडीच वर्षांपासून मार्गी लागत नसल्याने हा प्रकल्प कमालीचा रखडला आहे. बारामती तालुक्यातील तेरा गावातील जमिनीचे भूसंपादन करुन तो रेल्वेच्या ताब्यात देण्यासाठी बारामतीच्या उपविभागीय अधिका-यांची भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. 

'दोन नंबर संस्कृती' ही कोरोनापेक्षा भयानक; बाबा आढावांची खरमरीत टीका

या भूसंपादनासाठी रेल्वेने 115 कोटी रुपये जिल्हाधिका-यांकडे जमा करुनही आता अडीच वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. या पैकी 41 कोटी 17 कोटी रुपयांचे वाटप शेतक-यांना करण्यात आले आहे. लाटे व माळवाडी या दोनच गावातील बहुतांश जमिनीचे भूसंपादन करुन त्याची खरेदीखतही करण्यात आली आहेत. 

सोनकसवाडी व क-हावागज या दोन गावातील जमिनीची मोजणी शंभर टक्के पूर्ण झाली आहे, तर थोपटेवाडी व कुरणेवाडीमधील काही जमिनींचीच मोजणी झाली असून मूल्यांकनासाठी नगररचना विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

तांदुळवाडी, सावंतावाडी, नेपतवळण, ब-हाणपूर या चार गावांमधील फळझाडे, वनझाडे, बांधकामे यांचे मूल्यांकन अजूनही होणे बाकी आहे. कटफळ या गावातील जमिनीचा प्रस्ताव रेल्वे विभाग थेट एमआयडीसीला सादर करणार आहे. 

दरम्यान या रेल्वेमार्गामधील खामगळवाडी व ढाकाळे या दोन गावातील ग्रामस्थांचा या प्रस्तावित रेल्वेमार्गाला विरोध असून तेथे मोजणी करणे महसूल विभागाला दोन वर्षात शक्य झालेले नाही. मात्र आता ज्या जमीन मालकांची संमती आहे, त्यांचे संमतीपत्र घेण्यास तलाठ्यांना सांगण्यात आल्याचे महसूल प्रशासनाने सांगितले. 

दक्षिण भारताला जोडणारा मार्ग होणार...
दौंड-बारामती-फलटण-लोणंद-मिरज मार्गे दक्षिण भारतात वेगाने कमी अंतरात पोहोचणे शक्य होणार आहे. त्या मुळे हा रेल्वे मार्ग लवकर होणे गरजेचे आहे. बारामतीच्या विकासाच्या दृष्टीनेही हा मार्ग झाल्यास त्याचा मोठा फायदा होईल. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दृष्टीक्षेपात रेल्वे मार्ग...
•    बारामतीतील 13 गावातील 180.55 हेक्टर भूसंपादन होणार
•    या रेल्वेमार्गात 2638 शेतकरी बाधित होणार
•    भूसंपादनासाठी अंदाजे 239 कोटींची गरज भासणार
•    आतापर्यंत 41.17 कोटींच्या रकमेचे शेतक-यांना वाटप
•    रेल्वेने आतापर्यंत 115 कोटी रुपये भूसंपादनासाठी दिले
•    बारामती- फलटण 37 कि.मी. रेल्वेमार्ग होणार. 
•    नेपतवळणनजिक नवीन बारामती स्टेशन अस्तित्वात येणार.

(संपादन : सागर डी. शेलार)