Pune News : ग्रामपंचायतीच्या नोंदीत बनावट कारभार उघड; माजी सरपंच व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

Ranjangaon Fraud : माजी सरपंच व अधिकाऱ्यांवर फसवणूक आणि शासकीय कागदपत्रांतील छेडछाडीचा गुन्हा दाखल, पोलिस तपास सुरू
Fraud
Fraudsakal
Updated on

रांजणगावातील दस्तऐवजांत बनावट नोंदी

दोन माजी सरपंचांसह तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर, ता. १६ : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) ग्रामपंचायतीच्या शासकीय दस्तऐवजांमध्ये संगनमताने बनावट नोंदी करून फेरफार केल्याप्रकरणी तेथील दोन माजी महिला सरपंचांसह तत्कालीन (सन २००९ ते २०१९) ग्रामविकास अधिकाऱ्यांविरूद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रांजणगाव गावठाणातील कोट्यवधी रुपये किमतीच्या ७२ गुंठे जागेच्या मालकी हक्कावरून आनंदराव दिनकर पाचुंदकर व ग्रामपंचायत रांजणगाव यांच्यात सन २०१९ पासून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सरपंच सुवर्णा वायदंडे व ग्रामपंचायत अधिकारी गंगाधर देशमुख यांनी २४ एप्रिल २०२५ ला जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही या घटनेबाबत चौकशी करून तक्रार देण्याचे आदेश पंचायत समितीला दिले होते. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके, विस्तार अधिकारी बी. आर. गावडे व आर. आर. राठोड यांनी ७ एप्रिल रोजी ग्रामपंचायतीचे दप्तर तपासले असता ग्रामपंचायतीच्या सन २००९- १०च्या आकारणी रजिस्टरमध्ये फेरफार झाल्याचे आढळले. गावठाणातील मिळकत क्र. ६२२/१ व ६२२/२ च्या नोंदी असलेल्या पानांवर एक अतिरिक्त पान चिकटवून या बनावट पानावर नोंदी केल्याचे निष्पन्न झाले.

चौकशीदरम्यान, तत्कालीन ग्रामसेवक हनमंत चव्हाण यांच्या सांगण्यावरून या नोंदी लिहून नमुना रजिस्टरमध्ये चिकटवण्यात आल्याचे वसुली लिपिक संतोष शिंदे यांनी कबूल केले. ९ जून २००९ला तत्कालीन ग्रामसेवक रामदास नामदेव चव्हाण यांच्या कार्यकाळात मासिक सभा घेऊन मिळकतीच्या करापोटी करमागणी रक्कम कायम केल्याचे व छेडछाड केल्याचे दिसून आले. पुढे विवादीत मिळकतीबाबत २४ मार्च २०१६ला तत्कालीन सरपंच स्वाती पाचुंदकर व ग्रामविकास अधिकारी किसन बबन बिबे यांच्या संयुक्त सहीने उपअधिक्षक भूमिअभिलेख यांना पत्रव्यवहार करून संबंधित मिळकत आनंदराव पाचुंदकर यांची असून ग्रामपंचायतीचा कोणताही संबंध नाही, असे कळविले.

या चौकशीच्या अनुषंगाने गटविस्तार अधिकारी गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी संगनमताने फसवणूक, शासकीय कागदपत्रांत खाडाखोड व छेडछाडीचे गंभीर गुन्हे दाखल केले असून, सन २००९ ते २०१९ या कालावधीत हा गैरप्रकार झाल्याने त्या कालावधीतील सरपंच व ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तपास सुरू केला असून, तपासाअंती दोषींची नावे निष्पन्न होतील, असे या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस उपनिरीक्षक अशोक चव्हाण यांनी सांगितले.

रांजणगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावठाणातील सुमारे ७२ गुंठे जागा हडपल्याप्रकरणी ग्रामपंचायतीच्या तक्रारीवरून तत्कालीन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या जागेवर राज्य सरकारचे नाव लावण्याबाबत आदेश दिले होते. याविरोधात आनंदराव दिनकर पाचुंदकर यांनी दाखल केलेले अपील उच्च न्यायालयाने फेटाळले असून, पाचुंदकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी व निकाल प्रलंबित असतानाच रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने तत्कालीन सरपंच स्वाती पाचुंदकर व सुषमा शेळके यांच्यासह एस. के. खैरे, व्ही. ए. सोनवणे, आर. एन. चव्हाण व एच. एल. चव्हाण या ग्रामविकास अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com