esakal | पुणे-नाशिक रेल्वेसाठी जमिनीची मोजणी सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

Land Survey

पुणे-नाशिक रेल्वेसाठी जमिनीची मोजणी सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - रिंगरोडपाठोपाठ पुणे-नाशिक (Pune Nashik) सेमी हायस्पीड रेल्वे (Semi Highspeed Railway) प्रकल्पासाठी जमीन मोजणीचे (Land Survey) काम गतीने सुरू झाले आहे. हवेली तालुक्‍यातील १२ गावांपैकी ७ गावांमध्ये भूसंपादन करावयाच्या जमिनींच्या मोजणीचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. (Land Survey for Pune Nashik Railway Started)

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासालाही त्यामुळे गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी तीन जिल्ह्यातील सुमारे १ हजार ४७० हेक्‍टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या चार तालुक्‍यातून ५७५ हेक्‍टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. भूसंपादनासाठी १३०० ते १५०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून या जमिनींचे भूसंपादन केले जाणार आहे.

हेही वाचा: खडकवासला प्रकल्पात बुधवार अखेर ८४ टक्के पाणीसाठा

हवेलीमधील हडपसर, मांजरी खुर्द, मांजरी बुद्रूक, कोलवडी, साष्टे, बकोरी, वाडे बोल्हाई, तुळापूर, लोणीकंद, केसनंद, पेरणे, बावडी या गावांमधून हा रेल्वे मार्ग जाणार आहे. यातील कोलवडी, साष्टी, मांजरी खुर्द, तुळापूर, पेरणे, वाडेबोल्हाई आणि बावडी या गावांतील मोजणीचे काम पूर्ण झाले आहे, असे भूसंपादन अधिकारी रोहिणी आखडे यांनी सांगितले. रेल्वे मार्गासाठी या १२ गावांमधील सुमारे १३१ हेक्‍टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. पावसामुळे मोजणीत अनेकदा अडचणी येतात. त्यामुळे पुढील महिन्यापर्यंत हवेली तालुक्यातील गावांतील जमिनीच्या मोजणीचे काम पूर्ण होईल, असे अपेक्षित आहे. त्यानंतर भूसंपादन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

  • २३५ किलोमीटर - मार्गाची लांबी

  • २०० किलोमीटर - रेल्वेचा वेग (प्रतितास)

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • पुणे, नगर व नाशिक जिल्ह्यातून जाणार

  • १८ बोगदे, ४१ उड्डाणपूल, १२८ भुयारी मार्ग प्रस्तावित.

  • पुणे-नाशिक अंतर अवघ्या पाऊणेदोन तासांत

  • मार्गावर एकूण २४ स्थानकांची आखणी

  • प्रकल्पाच्या खर्चात ६० टक्के वित्तीय संस्था, २० टक्के राज्य सरकार, २० टक्के रेल्वेचा वाटा

loading image
go to top