

‘लँड टायटलिंग ॲक्ट’ जुलैपासून लागू होणार
चंद्रशेखर बावनकुळे ः महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरणार
ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : राज्यात येत्या जुलै महिन्यापासून ‘लँड टायटलिंग ॲक्ट’ लागू करण्यात येणार असून, असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. या कायद्यामुळे राज्यातील नागरिकांच्या मालमत्तांना अधिकृत आणि निश्चित मालकी हक्क प्राप्त होणार असून, त्या मालमत्तेचा जागतिक स्तरावर आर्थिक व्यवहारांसाठी उपयोग करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भारती विद्यापीठाच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार भीमराव तापकीर, भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार विश्वजित कदम, कुलपती शिवाजीराव कदम, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई आणि कुलगुरू विवेक साळवी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले की, दिवंगत पतंगराव कदम यांनी उभारलेले शैक्षणिक कार्य महाराष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक आहे. ‘गल्लीतली शाळा’ ते जागतिक स्तरावरील विद्यापीठ असा भारती विद्यापीठाचा प्रवास प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, विकसित भारताची संकल्पना शिक्षणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. राज्य शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) धोरणांतर्गत सुमारे दीड हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले असून, दीड लाख विद्यार्थ्यांना एआय तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रांसाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता उरलेली नसून, विविध प्रमाणपत्रे विनामूल्य उपलब्ध करून दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत राज्यातील ३० लाख विद्यार्थ्यांपर्यंत आवश्यक कागदपत्रे मोफत पोहोचविण्याची व्यवस्था उभी करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर येथे भारती विद्यापीठाचा विस्तार व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत आवश्यक जागा आणि शासनस्तरीय सहकार्य देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. आमदार कदम यांनी प्रास्ताविकातून भारती विद्यापीठाच्या ६२ वर्षांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा आढावा घेतला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना ‘डॉ. पतंगराव कदम स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच विद्यापीठातील संशोधक, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.