धक्कादायक ! गर्भवती महिलेला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने काढलं घराबाहेर...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

ज्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने मुंबई येथून आलेल्या गर्भवती महिलेस दौंडमध्ये घरमालक व अन्य भाडेकरींनी घराबाहेर काढले. त्याच दौंड तालुक्यात आजअखेर ५० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

पुणे : गर्भवती असल्याने ती महिला प्रसूतीसाठी मुंबईवरून माहेरी दौंड येथे आली होती. परंतु माहेरी तिच्या भावाच्या घरमालकाने तिला घरात थांबण्यास नकार देत बाहेर जाण्यास सांगितले. कारण तिचा एकमात्र दोष होता की ती मुंबई वरून आली होती. मुंबई वरून आल्याने कोरोनाचा संसर्ग होईल, या भीतीपोटी तिला घराबाहेर जाण्यास भाग पाडले असले तरी त्याच दौंडमधील एका संस्थेने तिचा भावासारखा सांभाळ केला आहे. राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेल्या त्या घरमालकाविरूध्द या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

आणखी वाचा- लाॅकडाउन वाढणार; पण...

मुंबई येथून दौंडकडे येण्यासाठी आवश्यक परवानग्या आणि वैद्यकीय चाचणी करून रेणूका अजय महाजन (वय २५, रा. अंधेरी, मुंबई) या आपल्या मुली आणि कंस्ट्रक्शन कंपनीत कामाला असलेल्या पतीसह २४ मे रोजी दौंड येथे आल्या. तिघांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के होते. सासू - सासरे हयात नसल्याने प्रसूतीसाठी त्या शहरातील खवटे हॅास्पिटल शेजारी चाळीत राहणाऱ्या भावाकडे आल्या होत्या. त्याची माहिती मिळताच चाळीतील अन्य भाडेकरींनी तक्रार केल्याने घरमालक तथा दौंड शहर राष्ट्रवादी युवक कॅांग्रेस अध्यक्ष सचिन गायकवाड याने मुंबई वरून आल्याने येथे राहायचे नाही, असे सांगत बाहेर जाण्यास सांगितले.

 कुत्र्याच्या हल्ल्यात `त्याने` गमावला जीव

दरम्यान, रेल्वे स्थानक परिसरात महादेव सेवा संघाकडून शिशू विकास मंदिर शाळेत लॅाकडाउन मधील निराधारांना जेवण व आश्रय दिला जात असल्याने महाजन दांपत्य मुलीसह तेथे दाखल झाले. पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांना माहिती मिळताच त्यांच्या पुढाकाराने खासगी रूग्णालयात रेणूका महाजन यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून वैशाली नागवडे यांनी या महिलेची जबाबदारी घेतली आहे.  

आणखी वाचा- पीएमपाच्या हजारो प्रवाशांच्या पासला मुदतवाढ

मुंबई वरून आल्याने येथे राहायचे नाही, असे सांगत सचिन गायकवाड याने माझी आई लता कोंजारे मध्ये पडल्या असता त्यांना मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली, अशा आशयाची फिर्याद काल (ता.२८) सायंकाळी रेणूका महाजन यांनी दौंड पोलिस ठाण्यात दिली. चाळीतील अन्य भाडेकरी घाबरल्याने दौंड येथे प्रसूतीसाठी आणू नका, असे महाजन यांच्या नातलगांना आधीच सांगितले होते. मी त्यांना बाहेर काढले नाही, असा दावा सचिन गायकवाड याने केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनामुळे `तिला` घराबाहेर काढले पण....
ज्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने मुंबई येथून आलेल्या गर्भवती महिलेस दौंडमध्ये घरमालक व अन्य भाडेकरींनी घराबाहेर काढले. त्याच दौंड तालुक्यात आजअखेर ५० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी ४९ जण दौंड शहरातील आहेत. बाधितांपैकी एकाचा मृत्यू झाला असून ३४ जण उपचारानंतर बरे देखील झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The landlord took the pregnant woman out of the house in daund