सिंहगडावरील कल्याण दरवाजाजवळील पायवाटेवर कोसळली दरड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

landslide on near Kalyan Darwaza on Sinhagad fort pune

सिंहगडावरील कल्याण दरवाजाजवळील पायवाटेवर कोसळली दरड

किरकटवाडी : सिंहगडावरील कल्याण दरवाजाजवळ तटबंदीच्या खालच्या भागातील दरड पायवाटेवर कोसळली आहे. दाट धुके असताना सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत चार ते पाच ट्रेकर्स थोडक्यात बचावले आहेत. प्रत्यक्षदर्शी स्वयंसेवकांच्या प्रसंगावधानामुळे इतर ट्रेकर्स व गडावर आलेल्या नागरिकांना याबाबत त्वरित माहिती मिळाल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. सकाळी सहा वाजता 'सिंहगड एथिक्स ट्रेक' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे तीनशे स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. सिंहगड पायथ्याशी असलेल्या आतकरवाडी-गोळेवाडी चौक-कोंढणपूरफाटा-कोंढणपूर- कल्याण-कल्याण दरवाजा-नरवीर तान्हाजी मालुसरे समाधी -पुणे दरवाजा-गाडीतळ-आतकरवाडी असा या स्पर्धेचा मार्ग होता.

स्पर्धकांना रस्त्याची माहीती देण्यासाठी जागोजागी सुमारे पन्नास स्वयंसेवक उभे होते. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास चार ते पाच स्पर्धक कल्याण दरवाजाजवळ पोहचले आणि अवघ्या पाच मिनिटांत मागे दरड कोसळली. कल्याण दरवाजापासून काही अंतरावर खाली उभे असलेल्या नरेश मावानी,संतोश शेळके, हेमंत कांचन व इतर दोन स्वयंसेवकांनी दरड कोसतानाची घटना प्रत्यक्ष पाहिली व खालून येणाऱ्या स्पर्धकांना याची माहिती देत त्यांना दुसऱ्या पायवाटेने गडावर सुखरूप पोहोचवले. तसेच इतर नागरीकांनाही याबाबत माहिती दिली.

"अचानक मोठा आवाज झाला व दगड-माती कोसळताना दिसली. पाचच मिनिटांपुर्वी पुढे गेलेले स्पर्धक कल्याण दरवाजाजवळ सुखरूप पोहोचल्याची खात्री केली व इतर स्पर्धकांना दुसऱ्या पायवाटेने जाण्यास सांगितले. दाट धुक्यामुळे काही दिसत नव्हते. मोठ्याने ओरडून नागरिकांना खाली न येण्याचे आम्ही सांगत होतो."

- नरेश मावानी, प्रत्यक्षदर्शी स्वयंसेवक.

"दरड कोसळल्याची माहिती मिळाली आहे,परंतु आज शनिवार असल्याने पर्यटकांची गर्दी असल्यामुळे घटनास्थळी जाता आले नाही. उद्या जाऊन पाहणी केली जाईल. ट्रेकर्स व पर्यटकांनी काळजी घ्यावी."

- बाळासाहेब जिवडे, वनरक्षक, सिंहगड.

Web Title: Landslide On Near Kalyan Darwaza On Sinhagad Fort Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..