Pune News : भाषा हा वादाचा विषय नसून संवादाचा आहे - डॉ इनामदार

विद्यार्थ्यांच्या अंतर्भूत काैशल्यांना वाढीस लावून त्यांना पुढील आव्हानांना पेलण्यास सक्षम करणे गरजेचे आहे. गरीब असणे हा गुन्हा नसून सर्वच विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळी काैशल्ये जन्मत:च उपलब्ध असतात.
language is not a matter of debate but of communication dr Inamdar in marathi language conservation program
language is not a matter of debate but of communication dr Inamdar in marathi language conservation programSakal
Updated on

- मोहिनी मोहिते

कँटोन्मेंट : भाषा हा वादाचा विषय नसून संवादाचा आहे आणि संवाद वाढला की मानसिकता संकुचित न राहता ती अधिकच विस्तारते असे मत डॉ. पी. ए. आय. विश्व विद्यापीठचे कुलपती, डॉ. पी. ए. इनामदार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडले.

यावेळी नुकताच आझम कॅम्पस येथील संपन्न झालेल्या स्पोकन मराठी अकॅडमी च्या वतीने घेण्यात आलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा सांगता व डॉ. पी. ए. इनामदार करंडक २०२४ चा पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी डॉ. इनामदार बोलत होते.

पुढे इनामदार म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या अंतर्भूत काैशल्यांना वाढीस लावून त्यांना पुढील आव्हानांना पेलण्यास सक्षम करणे गरजेचे आहे. गरीब असणे हा गुन्हा नसून सर्वच विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळी काैशल्ये जन्मत:च उपलब्ध असतात.

त्यांच्यातील या सुप्तगुणांना वाढीस लावून, त्यांच्या आवडी निवडी पाहता त्यांचे भवितव्य अधिक उज्वल कसे हाेईल हे शिक्षकांनी हेरून त्यादृष्टीने प्रयत्नही केले पाहिजेत. अशा स्पर्धांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढताे त्यामुळे त्यांच्यातील भाषिक काैशल्ये विकसित हाेतात, असे ते म्हणाले.

यावेळी अकॅडमीच्या संचालिका डॉ.नूरजहाँ शेख म्हणाल्या की, आझम कॅम्पसमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा केवळ स्पर्धांपुरता मर्यादित न राहता ताे एक महाेत्सव असताे. शिशुगटापासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून साजरा केला जाणारा हा आझम परिवारातील एक चैतन्यमय साेहळा असताे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई मंत्रालयातील सांस्कृतिक विभागाचे अवर सचिव बाळासाहेब सावंत, एम सी ई सोसायटी उपाध्यक्षा आबेदा इनामदार, कुलगुरू डाॅ.एम डी. लाॅरेन्स, अकॅडेमीच्या संचालिका डॉ. नूरजहाँ शेख, देवेंद्र भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये भाषिक कौशल्ये वाढीस लागावी, मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा या हेतूने दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दि. १४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

यंदाचे हे सातवे वर्ष असून या वर्षी स्पोकन मराठी अ‍ॅकॅडेमी, आयोजित डॉ. पी. ए. इनामदार करंडक अंतर्गत शालेय गटात व महाविद्यालयीन गटात अनेक जिल्हास्तरीय स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते.

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा याकरिता शाडूच्या मातीपासून दिलेल्या विषयावर वेगवेगळ्या प्रतिकृती तयार करण्याची चिकणमाती स्पर्धा पंधरवड्यानिमित्त पार पडली. यावेळी शालेय गटातील विद्यार्थ्यांना शनिवार वाड्याची प्रतिकृती तर महाविद्यालयीन गटातील विद्यार्थ्यांना तसेच शिक्षक शिक्षकेतर गटासाठी राष्ट्रीय चिन्हाची प्रतिकृती हा विषय देण्यात आला होता.

तब्बल २४० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेऊन आपल्या कल्पना शक्तीने सुंदर प्रतिकृती तयार केल्या. यावेळी विद्यार्थ्यांकरिता प्रसिद्ध शिल्पकार गणेश कळसकर यांच्या शिल्पकलेचे प्रात्यक्षिकही आयोजित केले गेले.

एरवी शाळा, महाविद्यालये, वार्षिक स्नेहसंमेलने अशावेळी शेलापागाेटे स्पर्धा हाेतात. त्या बऱ्याचदा वैयक्तिक पातळीवर गुणदाेषांवर आधारित असतात. परंतु दैनंदिन जीवनातील प्रसंगांवर आधारित, नात्या-नात्यांमधील संभाषणात बाेलले जाणारे व ऐकले जाणारे मार्मिक शेरे व तेही खास पुणेरी शैलीत म्हणजे पुणेरी टाेमणे.

अशा टाेमण्यांची आगळी वेगळी पहिली पुणेरी टाेमणे स्पर्धाही मराठी भाषा संवर्धन पंधरवडयानिमित्त पार पडली. या स्पर्धेत कॅम्पसच्या शिक्षकांनी, नियामक मंडळातील पदाधिकार्‍यांनीदेखील उत्सुफूर्त प्रतिसाद देत अनेक प्रसंगानुरुप टाेमण्यांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील संभाषणाचा विनोदी झालर असलेला हा प्रकार अवगत व्हावा या करिता अशा स्पर्धा इतरत्रही व्हाव्यात असे डाॅ. इनामदार यांनी सुचविले आहे.

याशिवाय जिल्हास्तरीय बालनाट्य स्पर्धा शालेय गटात घेण्यात आल्या. यामध्ये १७ नामवंत शाळांनी आपल्या दर्जेदार नाटकांचे सादरीकरण केले. माॅर्डन हायस्कूल मुलांचे यांच्या 'पदक' या नाटकाने प्रथम क्रमांक घेउन डाॅ. पी.ए.इनामदार करंडक व राेख ५०००/- रु.चे पारिताेषिक पटकावले.

तर द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे आर्यन स्कुल भिलारेवाडी आणि वारजे माळवाडी यांनी राेख रक्कम ३०००/- आणि २०००/- अशी बक्षिसं मिळविली. उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक स्मिता पवार यांना तर उत्कृष्ट लेखक म्हणून गाेविंद गाेडबाेले यांना 'झेप ' या नाटकाला मिळाला.

विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांची आेळख व्हावी याकरिता चुलीवर स्वयंपाक करणे ही स्पर्धाही या दरम्यान घेण्यात आली. दाेन तासांत महाराष्ट्रातील काेणत्याही प्रांतातील खादयपदार्थ चुलीवर तयार करावयाचा हाेता. या स्पर्धेस सर्व शिक्षकांनी उत्सफुर्त प्रतिसाद देत महाराष्ट्रातील सागाेपांग खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडविले.

या व्यतिरिक्त पतंग उडविणे स्पर्धा, गीत गायन स्पर्धाही शिक्षक शिक्षकेतर गटांकरिता घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्व कळावे याकरिता स्ंविधानाचे मुलभुत हक्क व शिक्षण एक अधिकार या विषयांवर जिल्हास्तरीय्र रांगाेळी स्पर्धा आयाेजित करण्यात आली हाेती. विविध भागातील एकूण ७८ संधांनी या स्पर्धेत सहभाग नाेंदविला.

शिशु गटातील विद्यार्थ्यांकरिता बडबड गीत स्पर्धा तसेच सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून , विविध समाजाच्या गटांतून तयार झालेली गीते, नाचाचे प्रकार, कविता, संकल्पना विद्यार्थ्यांना अवगत व्हाव्यात याकरिता लाेकनृत्य स्पर्धाही आयाेजित करण्यात आल्या हाेत्या.

याशिवाय पथनाट्य स्पर्धा , वादसंवाद स्पर्धा भित्तिपत्रक स्पर्धा अशा भरगच्च अभिरुची संपन्न कार्यक्रमांनी हा पंधरवडा नटलेला हाेता. यामध्ये भाषिक अभ्यास , खेळ तसेच मनाेरंजनाची सुयाेग्य गुंफ़ण करण्यात आली हाेती.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाच्या सांगता साेहळ्यास आझम कॅम्पस येथील सर्व संस्था प्रमुख, शिक्षक वृंद, आणि विद्यार्थी समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. पुनम साेनवणे व प्रा. रजत सय्यद यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. पुष्पा पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com