पुण्यात चंदन तस्करी करणारी मोठी टोळी सक्रिय; पोलिस प्रशासन निष्क्रिय

निलेश बोरुडे
Monday, 23 November 2020

बाबत सखोल तपास झाल्यास चंदन तस्करी करणारी मोठी साखळी उघड होण्याची शक्यता आहे.

किरकटवाडी : खडकवासला, किरकटवाडी, नांदोशी, गोऱ्हे बु.,डोणजे तसेच आजूबाजूच्या परिसरात चंदन तस्करी करणारी मोठी टोळी सध्या सक्रिय असून पुरावे मिळूनही हवेली पोलिस ठाण्याकडून कारवाईस विलंब होताना दिसत आहे. याबाबत सखोल तपास झाल्यास चंदन तस्करी करणारी मोठी साखळी उघड होण्याची शक्यता आहे.

 'मला चंपा म्हणता, ते चालतं का? चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीला सवाल​

खडकवासला येथील डी. आय. ए. टी. (उन्नत प्राद्योगिकी संस्थान) या लष्करी संस्थेच्या हद्दीतून वारंवार मोठ्या चंदनाच्या झाडांची चोरी होत आहे. 20 नोव्हेंबर रोजी पहाटे दोन वाजेच्या दरम्यान अंतर्गत रस्त्याला लागून असलेले सुमारे एक फूट व्यासाचे व चार ते पाच फूट उंचीचे चंदनाचे खोड चंदन चोरांनी कापून नेले. त्या ठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाला आवाज आल्याने त्याने आरडाओरड केली असता चंदन चोर करवत, कटर मशीन व इतर साहित्य सोडून पळून गेले.

सुरक्षारक्षक आल्याने पळून जाताना एका चंदन चोराच्या वाहन चालविण्याच्या परवान्याची पडलेली प्रतही त्याठिकाणी मिळाली आहे. हाती लागलेले साहित्य व वाहन चालविण्याच्या परवान्याची प्रत या आधारे लष्करी अधिकाऱ्यांनी तात्काळ हवेली पोलिस ठाण्यात भारत शिवाजी जाधव( मूळ रा. बोरीपार्धी, ता.दौंड,जि.पुणे.) याच्यासह त्याच्या दोन अज्ञात साथीदारांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. मात्र दोन दिवस उलटून गेले तरी हवेली पोलिस ठाण्याकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

चंदन चोरी होताना नेमकीच लाईट कशी गेली?.... 20 नोव्हेंबर रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास ज्यावेळी चंदनाच्या झाडाची चोरी होत होती त्यावेळी या परिसरातील संपूर्ण वीजपुरवठा बंद होता. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला होता की चंदन चोरी करण्यासाठी मुद्दाम करण्यात आला होता अशी शंकाही लष्करी अधिकाऱ्यांकडून उपस्थित केली जात आहे, कारण चोरीला गेलेले चंदनाचे झाड रस्त्याला लागून असल्याने वीजपुरवठा सुरू असताना मोठ्या प्रमाणात पथदिव्यांचा प्रकाश असल्याने चोरी करणे शक्य नव्हते.

पोलिस कारवाईस विलंब होत असल्याने लष्करी अधिकारी नाराज- चंदन तस्करांनी लष्करी हद्दीत शिरण्यासाठी तारेचे कुंपण तोडले आहे. यापूर्वीही चंदनाची झाडे चोरीला गेलेली आहेत. काही झाडे अर्धवट कापून ठेवण्यात आले आहेत. तक्रार दाखल करून तीन दिवस होऊन गेले तरी अद्याप साधी पाहणी करण्यासाठी सुद्धा पोलीस आलेले नसल्याने लष्करी अधिकाऱ्यांमध्ये पोलीस तपासाबाबत व पोलिसांच्या संथ कारवाईबाबत नाराजी दिसून येत आहे.

अनावश्यक वादात चंद्रकांत पाटील यांना ओढणं चुकीचं!​

कडक कारवाईसाठी पोलिस अधीक्षकांशी चर्चा.... चंदन तस्करीचे रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी व या चंदन चोरांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून सविस्तर माहिती दिल्याचे लेफ्टनंट कर्नल सिमरन सिंग भाटी यांच्याकडून सांगण्यात आले.

तात्काळ कारवाई बाबत हवेली पोलिस ठाण्याला कळवले जाईल. सखोल तपास करून चंदन चोरी करणारे, विकत घेणारे व इतर संबंधितांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल.-अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Large gang of sandalwood smugglers active in Pune