
वृत्तपत्र रद्दी टंचाईमूळे शेतकऱ्यासह टोमॅटो व्यापारी हतबल झाले आहेत. प्रतिकिलोग्रॅम तेरा रुपये या दराने मिळणाऱ्या रद्दीचे दर आज पस्तीस ते चाळीस रुपये प्रतिकिलोग्रॅम झाले आहेत.
नारायणगाव : वृत्तपत्र रद्दी टंचाईमूळे शेतकऱ्यासह टोमॅटो व्यापारी हतबल झाले आहेत. प्रतिकिलोग्रॅम तेरा रुपये या दराने मिळणाऱ्या रद्दीचे दर आज पस्तीस ते चाळीस रुपये प्रतिकिलोग्रॅम झाले आहेत.रद्दीच्या भावात तीन पट वाढ झाली असून पैसे देऊन ही रद्दी मिळत नसल्याने रद्दी देता का रद्दी अशी म्हणण्याची वेळ प्रथमच आली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोनामूळे मार्च महिन्यात काही दिवस वृत्तपत्र छपाई बंद होती. त्या नंतर वृत्तपत्रामूळे कोरोना संसर्ग होण्याचा धोका संभवतो. अशी अफवा सोशल मीडियाव्दारे पसरवण्यात आली होती. याचा एकूणच परिणाम वृत्तपत्र छपाई व खपावर झाला होता. या मुळे वृत्तपत्र रद्दीची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली असल्याचे मत व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.वाचकांच्या मनातील गैरसमज दूर होत असल्याने आता वृत्तपत्र खपात पुन्हा वाढ झाली आहे. मात्र रद्दीची टंचाई दूर होण्यास अजून दोन महिन्याचा अवधी लागणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
सद्यस्थितीत जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक व टोमॅटो व्यापारी यांच्याकडून वृत्तपत्र रद्दीला मोठी मागणी आहे. निर्यातक्षम द्राक्ष घडाचे उन्हा पासून व धुळी पासून सरंक्षण करण्यासाठी द्राक्ष उत्पादक द्राक्ष घडा भोवती वृत्तपत्राचा कागद गुंडाळतात. घडांच्या संख्येनुसार द्राक्ष बागेला एकरी चारशे ते पाचशे किलोग्रॅम रद्दीची गरज असते .रद्दीच्या भावात तीन पट वाढ झाल्याने द्राक्ष उत्पादकांचा खर्च वाढला आहे. हीच स्थिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो उपबजारातील व्यापाऱ्यांची झाली आहे.क्रेटमध्ये टोमॅटो पॅकिंग करताना वृत्तपत्र रद्दीचा उपयोग केला जातो.या मुळे येथील उपबजारात वृत्तपत्र रद्दीला मोठी मागणी आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
वाहतूकीत टोमॅटो खराब होऊ नये म्हणून क्रेटमध्ये टोमॅटो भरताना वृत्तपत्र रद्दीचा वापर केला जातो.शंभर क्रेटचे पॅकिंग करण्यासाठी दहा किलोग्रॅम रद्दी आवश्यक असते.एका क्रेटला १ रुपया ३० पैशाची रद्दी लागत असे.मात्र रद्दीच्या भावात वाढ झाल्याने एका क्रेटला रद्दीसाठी चार रुपये खर्च येतो.आज पैसे देऊन सुध्दा रद्दी मिळत नसल्याने व्यापारी अडचणीत सापडले आहेत.रद्दी बरोबरच हमाली,चिकट टेपच्या खर्चात सुध्दा वाढ झाली आहे. -संतोष घोलप, टोमॅटो व्यापारी, नारायणगाव उपबजार
(संपादन : सागर डी. शेलार)