लातूमध्ये विमाने घेणार घिरट्या

लातूमध्ये विमाने घेणार घिरट्या
Published on

---
सुशांत सांगवे : सकाळ वृत्तसेवा
लातूर, ता. ६ : येथे आकाशात लवकरच विमाने घिरट्या घेताना दिसणार आहेत. कारण, अनेक वर्षे बंद स्थितीत असलेल्या लातूर विमानतळावर लवकरच वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू होत असून ते मराठवाड्यातील पहिले ठरणार आहे. यासाठी येथे तीन विमाने दाखल झाली असून नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची (डीजीसीए) या केंद्राला सप्टेंबरअखेर अंतिम मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच येथून विमानांचे उड्डाण होणार आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या नवनव्या धोरणांमुळे भविष्यात वैमानिकांची मोठी गरज भासणार आहे. त्यामुळे शासनाने विविध जिल्ह्यांमध्ये असलेल्या छोट्या विमानतळांवर वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लातूरमधील विमानतळावर तीन वर्षांपूर्वी अशा प्रकारचे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार हे केंद्र ‘हर्क्युलस एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल’ (हॅट्स) या नावाने उभे राहिले आहे.

आतापर्यंत तीनवेळा तपासणी
‘हॅट्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव सिंह यांनी लातूर विमानतळावरील वैमानिक प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. यावेळी ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘हे केंद्र सुरू करण्यासाठी आम्हाला २०२३ मध्ये परवानगी मिळाली. त्यावेळी येथील विमानतळावर जी जागा मिळाली तिथे मोठे खड्डे होते. त्यामुळे तयारीला काही काळ लागला. या परिसराचा विकास करून आम्ही केंद्र उभारले आहे. महासंचालनालयाकडून त्याची आतापर्यंत तीन ते चार वेळा तपासणी झाली आहे. आता अखेरची तपासणी सप्टेंबरअखेर होणार आहे. सर्व नियमांची पूर्तता केली असून हे केंद्र लवकर सुरू होईल, अशी आम्हाला खात्री आहे’’.

पहिली तुकडी तीस जणांची
विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विमानतळांची आणि विमानांची गरज भासत आहे. याचा विचार करून सरकारने अधिकाधिक वैमानिक घडवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लातूरमधील केंद्रामध्ये तीन विमाने असून तीस विद्यार्थ्यांची पहिली तुकडी सुरू करण्यात येईल. प्रत्येकी दहा विद्यार्थ्यांसाठी एक विमान उपलब्ध असेल. या केंद्रामध्ये केवळ राज्यातीलच नव्हे तर देशभरातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात, असेही सिंह यांनी सांगितले.
---
कोट
--
लातूर शहर हे शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाते. या शहरात वैमानिक प्रशिक्षण केंद्र ही नवी सुविधा सरकारच्या मान्यतेने सुरुवात होत आहे. त्यामुळे लातूरच्या वैभवात नक्कीच भर पडेल.
- अभिनव सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी, हॅट्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com