सोनवडी सुपे येथे विविध जलसंधारण कामाचा शुभारंभ

विजय मोरे
गुरुवार, 3 मे 2018

सोनवडी सुपेकरानी यंदा गावची दुष्काळ आणि पाणीटंचाई कायमची मिटवून गाव पाणीदार करण्यासाठी 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेत भाग घेतला आहे.

उंडवडी : सोनवडी सुपे ( ता. बारामती) येथे 'पानी फाउंडेशन' उपक्रमाअंतर्गत जलसंधारणाची विविध कामे करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या वतीने मोफत पोकलेन मशिन उपलब्ध करुन दिले आहे. येथे या उपक्रमाअंतर्गत बांधबंधिस्तीच्या कामाचा शुभारंभ सरपंच मंदा मोरे व उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. 

ग्रामपंचायत सदस्य फत्तेसिंग गोंडगे, सोपान साळुंखे, प्रकाश मोरे, अर्जुन मोरे, अनिल कांबळे, अब्दुल सय्यद, ताराचंद थोरात, अभिजित जगताप, दादासाहेब जगताप, माजी उपसरपंच हारुण सय्यद आदींसह पानी फाऊंडेशन टिमचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

सोनवडी सुपेकरानी यंदा गावची दुष्काळ आणि पाणीटंचाई कायमची मिटवून गाव पाणीदार करण्यासाठी 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेत भाग घेतला आहे.

या उपक्रमात गावकऱ्यांनी श्रमदानातून 8 एप्रिलपासून मोठ्या प्रमाणावर गावच्या माथ्यावर सलग समतल चरची कामे केली आहेत. तसेच गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत साडे चार हजार रोपांची रोपवाटिका तयार केली आहे. 

या उपक्रमांतर्गत यांत्रिकीकरणात पोकलेन मशिनद्वारे विविध जलसंधारणाची कामे गावकऱ्यांना करावयाची आहेत. त्यानुसार पोकलेन मशिनद्वारे बांधबधिस्तीची कामे सुरु केली आहेत. यामध्ये शेततळे, बांधबधिस्ती व खोल सलग समतल चर या कामाचा समावेश आहे.

या कामांसाठी भारतीय जैन संघटनेने पोकलेन मशिन उपलब्ध करुन दिले आहे. या पोकलेन मशिनला दीड लाख रुपये इंधनासाठी शासनाकडून मिळणार आहेत, अशी माहिती ग्रामसेविका स्वाती ताकवले व उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Launch of various water conservation works at Sonawadi Supe