पुणे विद्यापीठाने घडविली वारी 'याची देही, याची डोळा'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला 'भक्तिरंग'कार्यक्रम...संतांच्या प्रतिमांचे पूजन...देशी फळझाडे लागवड आणि संगोपनाचा केलेला संकल्प याद्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ विभागातर्फे आयोजित 'स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी' 'एसपीपीयू एनएसएस वारी'चे ऑनलाईन उद्घाटन सोमवारी झाले.

पुणे : ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला 'भक्तिरंग'कार्यक्रम...संतांच्या प्रतिमांचे पूजन...देशी फळझाडे लागवड आणि संगोपनाचा केलेला संकल्प याद्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ विभागातर्फे आयोजित 'स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी' 'एसपीपीयू एनएसएस वारी'चे ऑनलाईन उद्घाटन सोमवारी झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

हे उद्घाटन कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संजीव सोनवणे, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या पुर्वार्धात विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या गुरुकुल शाखेतील विद्यार्थ्यांनी भक्तिरंग हा कार्यक्रम सादर केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. डाॅ. करमळकर म्हणाले,"यंदाच्या व्हर्चुअल वारीमधील उपक्रमांच्या माध्यमातून कोरोनामुळे नैराश्यात गेलेले विद्यार्थी आणि इतरांना त्यातून बाहेर काढण्याचे एक चांगले काम विद्यार्थ्यांद्वारे होणार आहे. ऑनलाईन वारीमुळे एक सकारात्मक वातावरण निर्मिती तयार होऊन कोरोनामुळे संभ्रमावस्थेत असणारे विद्यार्थी त्यातून बाहेर येतील."

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एसपीपीयू एनएसएस वारी'चे यंदाचे हे १६ वे वर्ष आहे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डाॅ. प्रभाकर देसाई यांनी उपक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले,  'कोविड-१९'मुळे यावर्षी प्रत्यक्ष वारीचे नियोजन शासकीय पातळीवर झालेले नाही. तरीही विद्यापीठाचे विद्यार्थी यावर्षी व्हर्च्युअल वारीमधील सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग नोंदवणार आहेत."
या वारीच्या माध्यमातून एक लाख देशी फळझाडांची लागवड व त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आल्याचे डाॅ. चाकणे यांनी सांगितले.

हा कार्यक्रम पुढील लिंकवर पाहता येईल :
- https://youtu.be/UYPWlJz7tOM  
- https://www.facebook.com/sppunss/


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Launch of 'Virtual Wari' organized by Savitribai Phule Pune University