Lavani : लावणीला राजाश्रयाबरोबरच लोकाश्रयही मिळाला पाहिजे - खासदार श्रीनिवास पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mp shrinivas patil

'लावणी ही चोरून बघण्याची कला नाही आणि डोळे फाडून बघण्याचीही नाही. तो एक विकार आहे. हा विकार घेऊन ही कला पाहिली तर ती टिकणार नाही.

Lavani : लावणीला राजाश्रयाबरोबरच लोकाश्रयही मिळाला पाहिजे - खासदार श्रीनिवास पाटील

हडपसर - 'लावणी ही चोरून बघण्याची कला नाही आणि डोळे फाडून बघण्याचीही नाही. तो एक विकार आहे. हा विकार घेऊन ही कला पाहिली तर ती टिकणार नाही. लावणी ही एकच अशी कला आहे ज्यामध्ये सगळं झाकलं जातं, लपलं आणि मातलंही काहीच जात नाही. तीला राजाश्रयाबरोबरच लोकाश्रयही मिळाला पाहिजे. ही जबाबदारी रसिक प्रेक्षकांची आहे,' असे मत खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.

येथील पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने लोककला क्षेत्रासाठी योगदान देत असलेल्या जेष्ठ लोकनाटय़ कलावंत अमन तांबे पुणेकर यांना राज्यस्तरीय ‘शाहीर पठ्ठे बापूराव,’ लावणी नृत्यांगणा रूपा बारामतीकर यांना लोकसाहित्यिक ‘डॉ. भास्करराव खांडगे’ तर, प्रसिध्द ढोलकीपटू गोविंद कुडाळकर यांना पठ्ठे बापूराव यांचे पट्टशिष्य ‘बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार २१ हजार रुपये, डॉ. भास्करराव खांडगे पुरस्कार १५ हजार रुपये आणि बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम झाला.

जेष्ठ सिने अभिनेत्री लीला गांधी, माजी नगरसेवक मारुती तुपे, बंडू गायकवाड, साधना बँकेचे संचालक सुरेश घुले, महादेव कांचन, अविनाश तुपे, स्मिता गायकवाड, दिपाली कवडे, दिलीप गायकवाड, विकास गायकवाड, अशोक आव्हाळे आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी आयोजित लावणी महोत्सवात रेश्मा वर्षा परितेकर पार्टी, शाहीर सगनभाऊ ग्रुप जेजुरी, आर्यभूषण थिएटर ग्रुप पुणे, कविता बंड निर्मित ढोलकीचा खनखनाट, पुष्पराज कलाकेंद्र जेजुरी, अशा संगीत पार्टींच्या कलावंतांनी आपली कला व आदाकारी सादर केल्या.

प्रतिष्ठानचे संस्थापक जयप्रकाश वाघमारे, कार्याध्यक्ष सत्यजित खांडगे, अध्यक्ष देविदास पाटील, मित्रावरुण झांबरे, डाॅ.शंतनु जगदाळे, रेश्मा परितेकर, रामदास खोमणे, संदीप घुले, बापू जगताप, आकाश वाकचौरे यांनी संयोजन केले.

शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्काराने यापूर्वी शकुंतला नगरकर, छाया खुटेगावकर, संजीवनी मुळे, रघुवीर खेडकर, सरस्वतीबाई कोल्हापूरकर अशा जुन्या पिढीतील नामवंत कलावंताना सन्मानित करण्यात आले आहे. दीपक वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.