ऋषितूल्य डीवाय दादा

ऋषितूल्य डीवाय दादा
Published on

ऋषितुल्य शिक्षणव्रती

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा देत व्यक्त केलेल्या भावना.

-डॉ. पी. डी. पाटील
................................................................
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांचे निधन हा आमच्या कुटुंबावर आणि व्यक्तिशः माझ्यावर खूप मोठा आघात आहे. दादा आमची प्रेरक शक्ती होते. कोल्हापूर जिल्ह्यातील छोट्या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दादांनी आपल्या आयुष्याची जवळपास ५०हून अधिक वर्षे शिक्षणक्षेत्राला वाहून घेतली. दोन वेळा आमदार झाल्यावर त्यांना पुढे सत्तेची मोठी पदे मिळाली असती; मात्र त्यांनी ‘ज्ञानदेव’ या आपल्या नावाला जागत एकदा स्वीकारलेले शिक्षणाचे व्रत जन्मभर निष्ठेने पाळले.
१९८० च्या काळात महाराष्ट्रात इंजिनिअरींग आणि वैद्यकीय उच्चशिक्षणाच्या संधी फार मर्यादित होत्या. खासगी संस्था कर्नाटकात होत्या. मात्र बहुजनांच्या मुलांना तिथे शिक्षण घेणे शक्य नव्हते. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी वैद्यकीय आणि इंजिनिअरींग शिक्षणाच्या विनाअनुदानित खासगी संस्थांचे धोरण आणले आणि शिक्षणाची कवाडे महाराष्ट्रातही खुली झाली. या प्रवाहात डीवाय दादांनी धीटपणे उडी घेतली व यश मिळवले.
मी १९८० मध्ये आकुर्डीच्या ‘बजाज’ कंपनीत नोकरी करीत होतो. त्याच वर्षी माझा दादांची ज्येष्ठ कन्या भाग्यश्री हिच्याशी विवाह झाला. जावई म्हणून त्यांचे पुत्रवत प्रेम, सहवास आणि आत्मीयता मला कायम लाभली. आमच्या सगळ्या परिवारात आणि माणसांमध्ये त्याचा सहज वावर होता. त्यांचे मला जाणवलेले वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आपले वैचारिक आग्रह इतरांवर लादले नाहीत. आपल्या माणुसकीवर त्यांनी कुणालाही मात करू दिली नाही. स्वतःच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा विसर न पडू देता ग्रामीण व शहरी भागातले शिक्षण याच्यातील अंतर कमी करून त्यांच्यामध्ये एक प्रकारचा तोल निर्माण करण्याचे काम दादांनी केले.
उद्योगधंद्याच्या उभारणीमुळे पिंपरी-चिंचवड परिसरात खूप परिवर्तन झाले. माहिती-तंत्रज्ञानाचे उद्योग पुण्यात आणि त्यातही पिंपरी-चिंचवड परिसरात अधिक विस्तारले. पुण्यातून या भागात स्थलांतरही वाढले. पुण्याच्या या जुळ्या शहराला पुण्याइतकेच शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र करता येईल, हे दादांनी आधीच हेरले होते. मुंबईत संस्था सुरू केल्यावर १९८४ मध्ये पिंपरीत ‘डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी’ स्थापन होऊन इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झाले. त्याचे उद्‍घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले. या कॉलेजच्या कुलसचिवपदाची जबाबदारी मला मिळाली. उद्योगनगरीत तंत्रशिक्षणाची पायाभरणी करणारी ही पहिली संस्था होती. त्या काळात दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी प्रचंड कष्ट उपसले. आजही ते दिवस आठवले की अंगावर शहारे येतात.
पिंपरी-चिंचवड आज महाराष्ट्राचे उच्च शिक्षणाचे ‘एज्युकेशनल हब’ बनले आहे. डीवाय दादांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या शिक्षणसंस्थांच्या माध्यमातून गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून जीवनाच्या सर्व क्षेत्रांना व्यापून टाकणाऱ्या विषयांचे शिक्षण व नवनव्या संधी उपलब्ध करुन देत आहेत. केवळ भारतात नव्हे तर जगभर आमचे हजारो विद्यार्थी कर्तृत्व गाजवत आहेत.

व्यक्तिमत्वातील सकारात्मकता
दादांचा भर वादांपेक्षा संवादावर अधिक राहिला. सकारात्मकता हा त्यांच्या व्यक्तित्वाचा भाग होता. सार्वजनिक जीवनात मोठी पदे भूषवूनही त्यांच्या स्वभावातील निर्मळता, प्रेम आणि दिलदारपणा अजिबात कमी झाला नाही. त्यांचे वाचन व लोकसंग्रह अफाट होता. अध्यात्मावर दादांचा दृढ विश्वास होता. ते बोलू लागले की, एखादा ऋषितुल्य तत्त्वज्ञ बोलतोय, असे जाणवायचे. आयुष्यात चांगला शिक्षणतज्ज्ञ म्हणून स्वतःची घडण करण्याचे निश्चित उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून त्यांनी अखेरपर्यंत प्रवास केला. अखेरच्या क्षणापर्यंत ते तृप्त आणि प्रसन्न होते. दादा केवळ शिक्षणतज्ज्ञ नव्हते. त्यापेक्षा विशाल, सहृदयी आणि कनवाळू समाजसेवक होते. त्यांचे जीवनज्ञान, कर्तृत्व आणि दातृत्वाचा समाजपरिवर्तनासाठी उपयोग करण्याची प्रेरणा केवळ आमच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण समाजापुढे दीपस्तंभाप्रमाणे राहील.

( लेखक पिंपरी येथील ‘डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठा’चे कुलपती आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com