esakal | बिबट्याचे बछडे पुन्हा विसावले आईच्या कुशीत

बोलून बातमी शोधा

Leopard
बिबट्याचे बछडे पुन्हा विसावले आईच्या कुशीत
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओतूर - येथे ऊसतोडणीदरम्यान आढळलेले बिबट्याचे दोन बछडे आईच्या कुशीत पुन्हा सुखरूप विसावले. हे बछडे यापूर्वीही वनविभागाला याच परिसरात आढळून आले होती. तेव्हा वनविभागाच्या प्रयत्नाने बिबट मादी त्यांना सोबत घेऊन गेली होती.

ओतूर येथील जाकमाथा येथे वैभव विलास तांबे यांच्या शेतात सोमवारी ऊसतोडणीदरम्यान दुपारी ऊसतोडणी कामगारांना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. याबाबत तांबे यांनी वनविभागाला माहिती देताच ओतूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके व वनरक्षक सुदाम राठोड, अतुल वाघोले हे घटनास्थळी उपस्थित झाले. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या संरक्षणाने शेतकऱ्यांचे ऊस तोडणीचे काम सुरळीत पार पडले. दरम्यानच्या काळात माणिकडोह बिबट निवारण केंद्राचे डॉ. निखिल बनगर हे घटनास्थळी आले.

वन विभागाचे अधिकारी व माणिकडोहचे पथक यांनी बिबट बछडे ताब्यात घेऊन त्यांची योग्य ती वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीदरम्यान दोन्ही बछडे हे नर जातीचे असून, ते यापूर्वी ६ एप्रिल रोजी त्याच परिसरात ऊसतोडणीदरम्यान आढळून आलेले व तेव्हाही मादीच्या कुशीत सुखरूप विसावलेले असल्याबाबत वनविभागाची खात्री पटली. त्यानंतर सायंकाळी ऊस तोडणी पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा मादीच्या भेटीसाठी बछडे शेतात ठेवले असता ते यशस्वीपणे आईच्या कुशीत विसावले.