#Leopard बिबट्यांचा आता ‘शास्त्रोक्त माग’

योगिराज प्रभुणे
शनिवार, 13 एप्रिल 2019

असा होणार अभ्यास 
सामाजिक -
 बिबट्यांमुळे निर्माण झालेल्या सामाजिक समस्या.
आनुवंशिकता - बिबट्यांची आनुवंशिकता, त्यांना किती पिले होतात, त्यांची वाढ कशी होते.
कॅमेरा ट्रॅकिंग - बिबट्यांची नेमकी संख्या शोधण्यासाठी कॅमेरा ट्रॅकिंग.  
रेडिओ कॉलर - बिबट्यांना रेडिओ कॉलर करून ते कुठे राहतात, कोणत्या मार्गाने प्रवास करतात याचा अभ्यास.

पुणे - जुन्नर आणि भोवतालच्या तालुक्‍यांमध्ये बिबट्यांची नेमकी संख्या किती आहे, याचे अचूक उत्तर अद्यापही वन विभागाकडे नाही. हे बिबटे जुन्नरच्या भागातच राहतात की, जवळच्या भागातही त्यांची ये-जा सुरू असते, याची ठोस माहिती आजही नाही. त्यामुळे सुमारे तीन दशके चाललेल्या बिबट्या-मानव संघर्षाच्या व्यवस्थापनाचा मार्ग सापडलेला नाही. हा नेमका मार्ग शोधण्यासाठी पहिल्यांदाच भारतीय वन्यजीव संस्थेची (डब्ल्यूआयआय) मदत घेण्यात येत आहे.

जुन्नर, आंबेगाव, शिरूर, दौंड भागांत बिबट्याचे वास्तव्य असल्याचे दिसते. विशेषतः या भागातील उसाची शेती ही बिबट्यासाठी सुरक्षित ठिकाण झाले आहे. त्यामुळे या भागात बिबट्याने माणसांवर हल्ले केल्याच्या घटना सातत्याने वाढत असल्याचे निरीक्षण वन विभागाने नोंदविले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी वनविभागाने आतापर्यंत बिबट्याला पकडणे आणि नंतर दुसरीकडे सोडणे, अशा प्रकारचे ‘पॅसिव्ह मॅनेजमेंट’ करण्यावर भर दिला. आता बिबट्याच्या व्यवस्थापनाची ही पद्धत निरुपयोगी असल्याचे स्पष्ट झाले. 

बिबट्या आणि मानव संघर्षावर उपाय म्हणून आता बिबट्यांच्या ‘ॲक्‍टिव्ह मॅनेजमेंट’ची गरज निर्माण झाली आहे. पण, या भागात नेमके किती बिबटे आहेत, त्यातील प्रौढ किती, त्यांची किती पिले आहेत, बिबटे याच भागात राहतात की, जवळपासच्या भागात ये-जा करतात, अशी कोणतीच ठोस माहिती वनविभागाकडे नाही. हेच बिबट्या आणि मानव संघर्षाच्या व्यवस्थापनातील प्रमुख अडथळा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ही माहिती संकलित करण्यासासाठी ‘डब्ल्यूआयआय’ची मदत घेण्यात येणार आहे. 

जुन्नर आणि परिसरातील बिबट्यांची सर्व माहिती मिळावी, यासाठी हा प्रकल्प भारतीय वन्यजीव संस्थेकडे प्रकल्प सोपविण्यात आला आहे. हा तीन वर्षांचा प्रकल्प असून, यासाठी सुमारे चार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी ९१ लाख रुपयांचा पहिला हप्ता या वर्षी देण्यात आला. 
- विवेक खांडेकर, मुख्य वनसंरक्षक, पुणे

बिबट्यांवर दिवस-रात्र नजर ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅकिंग करण्यात येणार आहे. तसेच पहिल्या टप्प्यात सुमारे १० बिबट्यांना रेडिओ कॉलर करण्यात येईल. हे बिबटे एकाच भागात राहतात की, दुसऱ्या भागातही ते स्थलांतर करत आहेत, याचा संपूर्ण अभ्यास करण्यात येईल. 
- डॉ. बिलाल हबीब, वन्यजीव शास्त्रज्ञ, वन्यजीव संस्था, डेहराडून


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard Counting WII