बिबट्याची दहशत (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑक्टोबर 2018

घोडेगाव/मंचर - घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी (ता. ५) व शनिवारी (ता. ६) रात्री बिबट्याने हल्ला केल्याने एकूण बारा लोक जखमी झाले आहेत. हे लोक मोटारसायकलवरून व पायी ये-जा करीत होते. बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जखमी झालेल्या १० नागरिकांना नखे व दात लागले आहेत. त्यांना ससूनमध्ये उपचारासाठी पाठविले आहे.  वन खात्याने उपाययोजनेसाठी साठ कर्मचारी व अधिकाऱ्यांचा बंदोबस्त रविवारी (ता. ७) संध्याकाळपासून भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यावर तैनात केला आहे.

चाकण, राजगुरुनगर, जुन्नर, मंचर, नारायणगाव या भागांतील वनकर्मचारी येथे दाखल झाले आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी तीन पिंजरे लावण्यात आले आहे. पण, गेली दोन दिवस हा बिबट्या पिंजऱ्याना हुलकावणी देत आहे. त्यामुळे वन खात्यापुढे अडचणी वाढल्या आहेत.  त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. 

जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे यांनी रविवारी संध्याकाळी घोडेगाव येथे भेट देऊन परिसराची पाहणी केली. त्यांच्यासमवेत घोडेगावचे वनक्षेत्रपाल योगेश महाजन, वनकर्मचारी व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक होते.  जखमींच्या सर्व औषधोपचाराची जबाबदारी वन खाते पार पाडत आहे. याबाबत आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याबरोबर चर्चा करून मंचर किंवा घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात आवश्‍यक असलेली प्रतिबंधक लस उपलब्ध व्हावी, म्हणून प्रयत्न केले जातील, असे म्हसे यांनी सांगितले.

बिबट्याची मादीपासून पिलांची ताटातूट झाली असावी. त्यामुळे बिबट्याची मादी आक्रमक झाली आहे, असा संशय आहे. येथे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. परिसरात डोंगर आहेत. त्यामुळे या मादीला लपण्यासाठी जागा मोठ्या प्रमाणात आहे. तिला पकडण्यासाठी तीन पिंजरे लावलेले आहेत. पण बिबट्या हुलकावणी देत आहे.
- अर्जुन म्हसे, उपवनसंरक्षक, जुन्नर विभाग

नागरिकांनी एकट्याने न फिरता हातात घुंगराची काठी घेऊन शेतात जावे. हौसी लोकांनी या परिसरात फिरकू नये.
- वाय. एस. महाजन, वनपरिक्षेत्र अधिकारी  घोडेगाव 

घटनाक्रम
ता. ३ ऑक्‍टोबर - बिबट्याने धोंडमाळ येथे दगडू धनगराची घोडी ठार केली होती. 
ता. ५ ऑक्‍टोबर - नीलंबर झाकडे, सागर क्षीरसागर, सुमीत फलके, रामदास बिबवे, उत्तम टेकवडे हे हल्ल्यात जखमी झाले आहेत. 
ता. ६ ऑक्‍टोबर - नीलेश राऊत, अक्षय लोहोट, किरण वाळुंज, रोहिदास येवले, संजय पारधी हे जखमी झाले आहेत. 

ड्रोनद्वारेही बिबट्याचा शोध 
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन खात्याने मोठी यंत्रणा उभी केली आहे. वनकर्मचारी व अधिकारी रविवारी रात्री येथे थांबणार आहेत. रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. ड्रोनद्वारेही चित्रीकरण करून बिबट्याचा शोध घेतला जाईल. बिबट्याने हल्ला केल्यानंतर जखमींना घोडेगाव किंवा मंचरच्या ग्रामीण रुग्णालयात प्रतिबंधक लस उपलब्ध नाही. त्यामुळे जखमींना पुण्याला न्यावे लागते. त्यामध्ये वेळ वाया जात आहे. अशी तक्रार जखमींनी केली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard in Ghodegav and manchar