वनविभागाने लावलेल्या पिंजऱयात अडकला बिबट्या

रविंद्र पाटे
सोमवार, 3 डिसेंबर 2018

नारायणगाव (जुन्नर, पुणे): येथील पाटे-खैरेमळा शिवारात दहशत निर्माण करणारा बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज (सोमवार) पहाटे अडकला. बिबट्या नर जातीचा असून, सुमारे आठ वर्ष वयाचा पूर्ण वाढ झालेला आहे. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्याची रवानगी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात केली आहे, अशी माहीती वनरक्षक मनीषा काळे यांनी दिली.

येथील पाटे-खैरेमळा शिवारात गेले वर्षभरा पासून चार बिबट्यांचा वावर आहे. येथील पुणे नाशिक महामार्गाच्या नियोजित बाह्यवळण रस्त्यावर रात्रीच्या वेळी बिबटे फिरताना व बसलेले दिसतात. या भागात मीना शाखा कालवा ते मीना नदी दरम्यानच्या सुमारे तीन किलोमीटरच्या परिसरात ऊस, द्राक्ष पिकाखाली बागायती क्षेत्र आहे. या भागात मुबलक पाणी व पाळीव जनावरे व ऊस क्षेत्र असल्याने बिबट्यांची संख्या वाढली आहे. गेले वर्षभरात बिबट्यांनी या भागातील पाळीव कुत्रे, शेळ्या व वासरे बिबट्यांनी फस्त केली आहेत. बिबट्यांची संख्या वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नारायणगाव ग्रामपंचायतीने वनविभागाशी पत्रव्यवहार करुण बिबटे पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वनविभागाने सहा दिवसा पूर्वी येथील सावंत यांच्या उसाच्या शेतात पिंजरा लावला होता. आज पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. या बाबतची माहीती विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष खैरे यांनी वनविभागाला दिली. बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

पिंजरा लावण्याची मागणी
या भागात अजून तीन बिबट्यांचा वावर आहे. पाच दिवसा पूर्वी चिमा केसकर या मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला केला होता. बिबट्याचा वावर वाढल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. उर्वरित बिबटे पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard Trapped in the cage at narayangaon