भुलीचे इंजेक्शन देऊन बिबट्याला विहरीतून सुरक्षित बाहेर काढले  

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

आळेफाटा : गुळुंचवाडी (ता. जुन्नर) येथे पिंपळझाप परिसरात आज (ता. १४) पहाटेच्या सुमारास एका विहिरीत सुमारे तीन वर्षे वयाचा बिबट्या पडल्याचे आढळून आले. माणिकडोहच्या बिबट्या निवारा केंद्राच्या रेस्क्यू टीमने येऊन जवळपास तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर, पिंजऱ्यातून विहिरीत उतरून काही अंतरावरून बिबट्याला भुलीचे इंजेक्शन मारले. त्यानंतर त्याला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. 

येथील पिंपळझाप परिसरात तुकाराम दगडू औटी व इतरांच्या मालकीच्या सामायिक विहिरीत, आज पहाटेच्या सुमारास एक बिबट्या पडल्याचे संबंधितांच्या आज (ता.१४) सकाळी निदर्शनास आले. त्यांनी याबाबत तातडीने वनविभागाला कळविले. दरम्यान ही विहीर अतिशय खोल असून, विहिरीच्या पाण्यात पोहून दमलेल्या बिबट्याने बसण्यासाठी विहिरीतील कपारीचा आधार घेतला. भक्षाचा पाठलाग करताना हा बिबट्या विहिरीत पडला असण्याची शक्यता वनविभागाचे प्रभारी वनपाल डी. डी. फापाळे यांनी व्यक्त केली.

रेस्क्यू टीमने आज दुपारी विहिरीत पिंजरा सोडून बिबट्यास विहिरीतून बाहेर काढण्यासाठी जवळपास तीन तास प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तरीही बिबट्या पिंजऱ्यात येत नव्हता. अखेर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बिबट्या निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख व डॉ. महेंद्र ढोरे हे पिंजऱ्यातून विहिरीत उतरले. यावेळी त्यांनी कपारीत बसलेल्या बिबट्याला दूरवरून भुलीचे इंजेक्शन मारल्यानंतर, बिबट्याला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. याप्रसंगी ओतूर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी. सी. येळे, प्रभारी वनपाल डी. डी. फापाळे, वनरक्षक बी. एस. शेळके, वन कर्मचारी जे. टी. भंडलकर उपस्थित होते. दरम्यान या बिबट्यास माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात हलविण्यात आले असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The leopard was safely taken out well