esakal | जातेगावात बिबट्या जेरबंद
sakal

बोलून बातमी शोधा

pune

जातेगावात बिबट्या जेरबंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिक्रापूर : गेल्या सहा महिन्यांपासून करंदी, जातेगाव खुर्द व जातेगाव बुद्रुक (ता.शिरूर) गावच्या हद्दीतील सुमारे १५०० हेक्टर ऊस क्षेत्रात धुमाकुळ घालणारा बिबट्या आज (ता.१३) पहाटे वनखात्याच्या पिंज-यात जेरबंद झाला. मादी जातीचा, पूर्ण वाढ झालेल्या या बिबट्यामुळे गेले महिनाभर तिनही गावचे ग्रामस्थ रात्री बाहेर पडत नव्हते. काही प्रमाणात आता बिबट्याची दहशत कमी होणार असली तरी अजुनही दोन बिबटे या भागात असण्याची शक्यताही ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

करंदी, जातेगाव बुद्रुक व जातेगाव खुर्द ही मोठ्या ऊस लागवडीचे क्षेत्र असलेली गावे. पर्यायाने ऊसात रहिवास करण्यासाठी सोपे असल्याने या भागात एक बिबट्याचे दर्शन दररोज कुणाला कुणाला होत असे. काही घरांच्या गोठ्यातील शेळ्या, वासरे, कुत्री आदींवर हल्लेही नित्याचे झाले होते. वनखात्याकडे पाठपूरावा केल्यानंतर आठ दिवसांपूर्वी जातेगाव खुर्द येथील धोंडीबा आप्पा मासळकर यांच्या शेतात एक पिंजरा लावण्यात आला होता.

त्यात गावातीलच नजीर मुलानी या युवकाने एक शेळी ठेवली आणि त्याच प्रलोभनाने बिबट्या आज पहाटे पिंज-यात अडकला. गावातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, पोलिस पाटील किसन गजरे तसेच शिक्रापूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळूंखे, वनसहायक ए.व्ही. हरगुडे तसेच पोलिस नाईक के.बी.कांबळे यांच्या उपस्थितीत पकडलेला बिबट्या जुन्नर येथील बिबट्या निवारण केंद्रात त्याची रवानगी केल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.

बिबट्या जेरबंद पण दहशत कायमच..!

बिबट्या जेरबंद झाला असला तरी आणखी दोन बिबटे अजुनही याच भागात फिरत असल्याची माहिती स्थानिक शेतकरी देतात. रात्री-अपरात्री फिरणे भितीदायक असून बिबटे रस्त्याला आडवे होवून तसेच थांबून राहत असल्याचे अनेक प्रसंग सध्या या भागात सुरू असल्याने एक बिबट्या पकडला गेला तरी दहशत कमी झाली नसल्याचे चित्र आहे.

loading image
go to top