
पुणे परिसरात गारठा झाला कमी
पुणे - पुणे शहर (Pune City) आणि परिसरात गारठा (Cold) कमी झाला असून किमान तापमानात (Temperature) सरासरीपेक्षा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ही स्थिती आठवडाभर अशीच कायम राहणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने वर्तविले आहे. शहरात शुक्रवारी १२.१ अंश सेल्सिअस किमान तर २९.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
पुणे शहर आणि परिसरात सध्या थंडीचा कडाका कमी झाला असून दिवसा ही उकाडा जाणवू लागला आहे. येत्या सोमवारपासून (ता. १४) शहर आणि परिसरात दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तसेच किमान तापमानात सातत्याने वाढ होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: पुणे : एकूण सक्रिय (ॲक्टिव्ह) कोरोना रुग्णांची संख्या ९,००० खाली; ७ जणांचा मृत्यू
राज्यात कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू असून कमाल आणि किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. सध्या उत्तर महाराष्ट्रासह विदर्भाच्या किमान तापमानात घट झाली आहे. तर दक्षिणेकडील जिल्ह्यात उन्हाचा चटका कायम आहे. तर मंगळवारी (ता. १५) विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
राज्यात शुक्रवारी सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी येथे ३५.२ अंश सेल्सिअस तर नीचांकी तापमानाची नोंद ११.३ अंश सेल्सिअस नाशिक येथे झाली. सध्या बिहारपासून उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विरून गेला. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे तमिळनाडू, केरळ या राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रातही अंशतः ढगाळ हवामानामुळे राज्यातील तापमानात चढ-उतार पाहायला मिळेल.
Web Title: Less Cold In Pune Area
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..