जुन्नरच्या जनावरांच्या बाजाराला उतरती कळा

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

जुन्नर व बेल्हा येथील जनावरांच्या बाजारास उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी दिवसभर चालणारे हे बाजार आता अवघ्या काही तासांतच आटोपले जात आहेत. दिवसेंदिवस बैलांची व अन्य जनावरांची आवकही घटत चालली आहे.

जुन्नर (पुणे) : जुन्नर व बेल्हा येथील जनावरांच्या बाजारास उतरती कळा लागल्याचे दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी दिवसभर चालणारे हे बाजार आता अवघ्या काही तासांतच आटोपले जात आहेत. दिवसेंदिवस बैलांची व अन्य जनावरांची आवकही घटत चालली आहे.

ऐतिहासिक परंपरा असलेला भाद्रपद महिन्यात अनंत चतुर्थीला जुन्नरला भरणारा गाढवांचा बाजारदेखील काळाच्या ओघात बंद पडला आहे. एकेकाळी जुन्नर व बेल्हे येथे बैलांचा मोठा बाजार भरायचा. यांत्रिकीकरणामुळे शेतीसाठी बैलांचा काळाच्या ओघात कमी झाला. याबरोबरच बैलगाडा शर्यतीवर आलेल्या बंदीचा परिणाम या बाजारावर झाल्याचे सांगण्यात येते.

अर्थकारणाला फटका
जुन्नर व बेल्हे येथील जनावरांच्या बाजाराला उतरती कळा लागल्यामुळे परिसरातील अर्थकारणाला देखील फटका बसला आहे. प्रामुख्याने हातगाडीवरील विक्रेते, लहान मोठे हॉटेल, तसेच जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहन व्यवसायावर परिणाम झाला आहे. शेतकरी जनावरांच्या विक्रीसाठी घोडेगाव व चाकण येथे जाणे पसंद करू लागले असल्याने, जुन्नर तालुक्‍यातील जनावरांची विक्री आंबेगाव व खेड तालुक्‍यांत होत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

लिलाव परवडत नाही
दर आठवड्यात शेळ्या, मेंढ्या, बोकड, गाई, बैल, म्हैस आदी जनावरांचा बाजार जुन्नरला रविवारी, तर बेल्हे येथे दर सोमवारी भरतो. मात्र, बाजारात खरेदी-विक्रीसाठी येणाऱ्या जनावरांची संख्या ही गेल्या पाच वर्षांपासून कमी-कमी होत चालली आहे. बाजारातील शेण गोळा करण्यासाठी पूर्वीपासून शेणचिपाडाचा लिलाव होत असतो. मात्र, जनावरांअभावी पुरेसे शेण जमा होत नसल्याने, हा लिलाव घेणेही संबंधितांना आता परवडेनासे झाले आहे. यामागची कारणे शोधून हे बाजार पूर्ववत कसे होतील याकडे लक्ष देण्याची खरी गरज आहे.

आवक, विक्रीवर परिणाम
जुन्नरला पाच वर्षांपूर्वी 32 हजार शेळ्या मेंढ्या तर 42 हजार गाई बैल यांची विक्रीसाठी आवक झाल्याची नोंद आहे. मात्र, मागील वर्षात त्यांची संख्या जवळपास निम्म्याने घटली आहे. यामुळे जनावरांच्या बाजारास पुन्हा ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे झाले आहे.

विविध सुविधांची आवश्‍यकता
सुमारे एक वर्षांपूर्वी जुन्नर येथे भरणाऱ्या जनावरांच्या बाजाराची जागा बदलण्यात आली. परंतु, सुविधांचा अभाव असल्याने शेतकरी बाजारात जनावरे घेऊन येण्यास उत्सुक नाहीत. वाहनातून जनावरे उतरविणे, पिण्याचे पाणी, जनावरे बांधून ठेवण्यासाठी व्यवस्था, शेतकऱ्यांना निवास याबाबत शेतकरी व व्यापारी समाधानी नाहीत. बाजारात होणारा चिखल, पसरलेली खडी जनावरांसाठी त्रासदायक होत असल्याचे सांगण्यात येते. बेल्हे येथे म्हैस बाजार एका बाजूला कोपऱ्यात ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील जागेत भरतो. बेल्ह्यात म्हैस बाजारासाठी पुरेशी जागा नसल्याने देखील नाराजी व्यक्त केली जात आहे. बेल्हे बाजारात जनावरे खरेदी-विक्रीसाठी येणारे शेतकरी व व्यापारी यांच्यासाठी "शेतकरी निवास' सारख्या सुविधा उपलब्ध आहेत मात्र त्यांचा शेतकऱ्यांकडून वापर होताना दिसत नाही. तसेच बेल्ह्यात शेळी बाजार ओढ्याजवळ खासगी जागेत भरतो. याठिकाणी वाहने लावण्यासाठी कोणतीही सुविधा नसून, गाड्या रस्त्यावर अस्ताव्यस्त लावलेल्या असतात. तसेच बाजारात आणलेल्या शेळ्या-मेंढ्या मृत झाल्यास त्या तशाच टाकून दिल्या जातात, यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Less Response For Animal Market In Junner