केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचे खासदार डॉ. कोल्हे यांना पत्र, कारण...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 October 2020

पुणे-नगर-औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ या ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाचे काम 'भारतमाला परियोजना फेज-२' मध्ये घेण्याचे नियोजन असून, त्यानुसार डीपीआरची तयारी केली जात असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पत्र पाठवून कळविले आहे.

कोरेगाव भीमा : पुणे-नगर-औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ या ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाचे काम 'भारतमाला परियोजना फेज-२' मध्ये घेण्याचे नियोजन असून, त्यानुसार डीपीआरची तयारी केली जात असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पत्र पाठवून कळविले आहे.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी वाघोली ते शिरुर पर्यंतच्या रस्त्याचे सहापदरीकरण करण्याच्या कामाचा डीपीआर तयार करण्यासाठी कन्सल्टन्ट नियुक्त करण्याबाबत शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना मार्च महिन्यात पत्र पाठवले होते.

तसेच नुकत्याच पार पडलेल्या संसद अधिवेशन काळात याचा पाठपुरावाही केला होता. डॉ. कोल्हे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत केंद्रीयमंत्री गडकरी यांनी पुणे - अहमदनगर - औरंगाबाद हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ म्हणून घोषित करण्यात आला असून "भारतमाला परियोजना" अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पास प्राधान्य देण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने जारी केल्या असल्याचे या पत्रात नमूद केले आहे.

बार, हॉटेलचालकांनो, आता नियम मोडू नका नाहीतर... 

केंद्रीय रस्ते परिवहन व राजमार्ग मंत्रालयाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे - अहमदनगर - औरंगाबाद हा ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्ग म्हणून विकसित करणार असून केंद्राच्या अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीने (CCEA) मान्यता दिल्यानंतर हा प्रकल्प हाती घेण्यात येईल, असे केंद्रीयमंत्री गडकरी यांनी कळवले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खासदारपदी निवडून आल्यानंतर जनतेच्या मागणीनुसार पुणे-नगर, पुणे-नाशिक तसेच तळेगाव-चाकण-शिक्रापूर या महामार्गाच्या कामाचा पाठपुरावा सुरू केला. या दरम्यान राजगुरुनगर ते आळेफाटा या पुणे जिल्हा हद्दीदरम्यानची बाह्यवळण रस्त्यांचीही कामे मार्गी लागली असून, सध्या पुणे-नगर रस्ता, नाशिकफाटा ते चांडोली व तळेगाव-चाकण-शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गांच्या कामावर लक्ष केंद्रित केल्याचे सांगत आगामी काळात शिरूर लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीचा प्रश्न नक्की सुटेल, असा विश्वास डॉ. कोल्हे यांनी व्यक्त केला.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Letter from Nitin Gadkari to MP Amol Kolhe regarding Pune-Nagar-Aurangabad National Highway work