पुणे : मांजर पाळण्यासाठी घ्यावा लागणार परवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cat

कुत्रे पाळण्यासाठी महापालिकेचा परवाना घ्यावा लागतो, त्याच पद्धतीने आता घरात मांजर पाळण्यासाठी परवाना घ्यावा लागणार आहे.

पुणे : मांजर पाळण्यासाठी घ्यावा लागणार परवाना

पुणे - कुत्रे पाळण्यासाठी महापालिकेचा परवाना घ्यावा लागतो, त्याच पद्धतीने आता घरात मांजर पाळण्यासाठी परवाना घ्यावा लागणार आहे. आरोग्य विभागाच्या या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली. दरम्यान, पुढील आठ दिवसात मांजराचा परवाना घेण्याची प्रक्रिया ऑनलाइन केली जाणार आहे.

महापालिका अधिनियमानुसार कुत्रे, घोडे, मांजर अशा सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांची नागरिकांनी महापालिकेकडे नोंदणी करून परवाना घेणे आवश्‍यक आहे. पण शहरात केवळ कुत्रे व घोडे यांचे परवाना घेतले जात पण त्यांचीही संख्या कमी आहे. महापालिकेच्या माहितीनुसार शहरात १ लाखापर्यंत पाळीव कुत्रे आहेत, पण आत्तापर्यंत केवळ ५ हजार ५०० कुत्र्यांची नोंदणी महापालिकेकडे झालेली आहे. मांजर पाळण्याचे प्रमाणही वाढत असले तरी परवाना घेण्याबाबत नागरिकांची मानसिकता नाही.

पाळीव प्राण्यांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती वाढत आहे. अनेक शेजारच्या घरात खूप मांजर पाळले आहेत, त्यांचा त्रास होतो अशा तक्रारीही महापालिकेकडे येतात. यापूर्वी अशा स्वरूपाचे वाद पोलिस ठाण्यापर्यंत गेलेले आहेत. त्यामुळे कुत्र्यांप्रमाणे पाळीव मांजराची महापालिकेकडे नोंदणी करणे आवश्‍यक होत आहे.

मांजराची नोंदणी करण्यासाठी वार्षिक ५० रुपये इतके शुल्क निश्‍चीत केले आहे. नोंदणीसाठी नागरिकांच्या रहिवासी पुरावा, ॲटीरेबीज लसीकरण प्रमाणपत्र आणि मांजराचा फोटो या तीन कागदपत्रांची गरज आहे. दरवर्षी नव्याने नोंदणी करावी लागेल. या नूतनीकरण करताना ५० रुपये परवाना शुल्कशिवाय अतिरिक्त २५ रुपये शुल्क घेतले जाणार आहे. यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

महापालिकेने कुत्र्यांची नोंदणी व परवाना घेण्याची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. त्याच पद्धतीने मांजराची नोंदणीही ऑनलाइन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील आठ दिवसात ही सुविधा उपलब्ध होईल, असे महापालिकेच्या डॉ. सारिका फुंडे यांनी सांगितले.