तळ्यात बुडणाऱ्या लहान मुलांना जीवदान देणाऱ्याचे बालदिनानिमित्त कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 पोहण्यात तरबेज असलेला आयुष घोडेस्वारीतही निष्णात आहे.

तळ्यात बुडणाऱ्या लहान मुलांना जीवदान देणाऱ्याचे बालदिनानिमित्त कौतुक

भोसरी : आयुषला तळ्यात काहीजण बुडत असल्याचे दिसते...परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तो पाण्यात एका मागून एक उडी घेत तीन बुडणाऱ्या लहान मुलांना तळ्याबाहेर काढतो आणि दोन मुलांना जीवदान देतो...ही काल्पनिक घटना नाही तर दोन मुलांना 'आयुष्य' देणाऱ्या आयुष गणेश तापकीर या अवघ्या तेरा वर्षाच्या मुलाच्या शौर्याची नि धैर्याची भोसरीत दोन महिन्यापूर्वी घडलेली सत्य घटना आहे. त्याच्या या शौर्यामुळे बालदिनानिमित्त त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

भोसरीतील गुळवेवस्तीत राहणारा आयुष अगदी वयाच्या तिसऱ्या वर्षापासून त्याचे चुलते संदीप तापकीर आणि युवराज तापकीर यांच्याबरोबर पोहण्याचा सराव करत असल्याने आता पोहण्यात तो तरबेज आहे. त्याचप्रमाणे तो कुस्तीपट्टूही असल्याने कुस्ती स्पर्धेत त्याने काही पारितोषिकही पटकाविली आहेत. त्याचप्रमाणे तपकीर यांच्या घरी शर्यतीचा बैलगाडा असल्याने शर्यतीत बैलगाड्यापुढे बेफाम घोडा पळविण्यातही आयुष तरबेज आहे. आजच्या काळात बरीचशी मुले मोबाईलमधील खेळाच्या काल्पनिक जगात वावरत असताना आयुषने अभ्यासाबरोबरच जोपासलेली ही कला कौतुकास पात्र आहे.

हेही वाचा: बाजीरावांचे पुणे ते मस्तानीचे पाबळ पुढील महिनाभरात PMPML बसेस धावणार

तापकीर कुटुंबियांचा भोसरीतील सद्गगुरुनगरमध्ये गुरांचा गोठा आहे. या गोठ्यापासून काही अंतरावर पाण्याचे तळे आहे. हे तळे गावापासून लांब अंतरावर असलेल्याने तळ्याजवळ नागरिकांची वर्दळ तुरळकच असते. या तळ्यात तापकीर यांच्या म्हशी पाणी पिण्यासाठी जातात. आयुषही काही वेळेस या गोठ्यात गुरांची देखभाल करण्यासाठी जातो. दोन महिन्यापूर्वी २७ सप्टेंबरला आयुष तळ्यात बसलेल्या म्हशींना पाहण्यासाठी गेला. मात्र त्याला तेथे तळ्यावर एक लहान मुलांचा हात तरंगताना दिसला. जवळूनच जाणाऱ्या एका तरुणाला आयुषने हात पाण्यावर तंरगत असल्याने बुडणाऱ्याला वाचविण्याची विनंती केली. मात्र तो तरूण तेथून पळून गेला. ही घटना पाहून तळ्यावर कपडे धुण्यासाठी आलेल्या काही बायकाही पळून गेल्या. आता आयुषकडे दुसरा पर्याय उरला नव्हता. आयुषने परिस्थितीचे गांभीर्य ओळखऊन तळ्यातील पाण्यात उडी मारून तो हात धरला.

मात्र बुडणारा मुलगा घाबरून आयुषला मिठी मारण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र या प्रसंगालाही न घाबरता आयुषने त्याला पाण्याबाहेर काढले. तेव्हा त्याने आणखीही तिघेजण पाण्यात बुडाले असल्याचे सांगितले. आयुषने पुन्हा पाण्यात उडी मारली. तेव्हा त्याला पाण्यावर डोक्याची केसे तरंगताना दिसली. त्याने केसांना पकडून दुसऱ्या मुलाला बाहेर काढले. पुन्हा पाण्यात उडी मारली. मात्र तिसरा मुलगा पूर्णपणे पाण्यात बुडाला होता. आयुषने बेशुद्धावस्थेत असलेल्या त्या तिसऱ्या मुलालाही बाहेर काढले. मात्र चौथा मुलगा तळ्याच्या तळाशी गेल्याने आयुषने दोन वेळा प्रयत्न करूनही त्याला तो दिसला नाही.

हेही वाचा: "कोविड काळातील भरपाई दिल्याशिवाय स्कुल बसेस धावणार नाहीत"

मात्र आयुषने बेशुद्धावस्थेतील लहान मुलाच्या छातीवर आणि पोटावर दाब देत त्याच्या पोटातील पाणी बाहेर काढले. तो तिसरा मुलगाही शुद्धीवर आला. आयुषशिवाय तेथे मदत करणारे कोणीही नसल्याने आठवीत शिकणाऱ्या आयुषने मोबाईलवर शंभर क्रमांक दाबून पोलिसांना घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाने दोन तास प्रयत्न करून तळ्याच्या कपारीत अडकून बसलेल्या चौथ्या मुलाचा मृतदेह पाण्याबहेर काढला. या घटनेत शुद्धीवर आलेल्या तिसऱ्या मुलाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र आयुषने वेळीच दाखविलेल्या प्रसंगावधानाने दोन लहान मुलांचे प्राण वाचले. तळ्याच्या पाण्यात पोहण्यास आलेली ही मुलेही बारा ते चौदा वर्षे वयाची होती. आयुषही अवघ्या तेराच वर्षांचा आहे. मात्र त्याने दाखविलेल्या या शौर्यामुळे दोघांचे प्राण वाचले. या अचाट कामगिरीबद्दल पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून बालदिनानिमित्त आयुषवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आयुषचा हट्ट...

२७ सप्टेंबरला आयुषला चुलते संदीप तापकीर यांच्याबरोबर गोठ्याकडे जायचे होते. मात्र त्याच दिवशी शाळेतून आॅनलाइन प्रश्नपत्रिका मिळाली होती. ती घरीच बसून सोडविण्यासाठी आयुषला घरचे सांगत होते. मात्र आयुषने ही प्रश्नपत्रिका आॅनलाइन सोडविणार असल्याचे सांगत चुलत्यांबरोबर गोठ्यावर गेला. गोठ्यापासून सुमारे अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या तळ्यात बसलेल्या म्हशी पाहण्यासाठी आयुष तळ्याकडे गेला. त्यामुळेच तो लहान मुलांना वाचवू शकला.

राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने प्रतिक्षा...

कठीण प्रसंगात अतुलनीय शौर्य दाखविणाऱ्या भारतातील १६ वर्षाखालील मुला-मुलींना राष्ट्रीय शौर्य पुरस्काराने २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त सन्मानित केले जाते. आयुषनेही स्वतःचा जीव धोक्यात घालून बुडणाऱ्या त्याच्याच वयाच्या दोन मुलांचे प्राण वाचविले आहेत. त्यामुळे आयुषलाही हा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळणे गरजेचे आहे. पोलिस आयुक्तालयाने तापकीर कुचुंबियांना शौर्य पुरस्कारासाठी प्रस्ताव पठविण्याचे वचन दिले होते. मात्र आयुक्तालयाद्वारे प्रस्तावच पाठविण्यात न आल्याने तापकीर कुटुंबियांनी शुक्रवारी (ता. १२) हा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे.

loading image
go to top