अक्षय बोऱ्हाडे यांचा प्रवास : सायबर कॅफेतील कामगार ते सामाजिक कार्यकर्ता 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 मे 2020

अक्षय बोऱ्हाडे नक्की कोण आहेत, त्यांनी मनोरुग्णांच्या सेवेस कशी सुरवात केली, त्यांचे सध्या काम काय सुरू आहे, त्यांना एकदा तुरुंगवारीही करावी लागली आहे. ते कोणते प्रकरण आहे, या विषयी घेतलेला हा आढावा...   

पुणे : अक्षय बोऱ्हाडे, हे नाव गेल्या तीन दिवसांपासून समाज माध्यमांवर गाजत आहे. ते अगदी तरुण वयात जुन्नर तालुक्यात मनोरुग्णांसाठी कार्य करत आहेत. मात्र, त्यांनी तीन दिवसांपूर्वी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आरोप केला की, तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी त्यांना मारहाण केली. मात्र, शेरकर यांनी त्यांचे आरोप फेटाळून लावले. मात्र, तेव्हापासून समाज माध्यमावर अक्षय यांची चर्चा सुरू झाली. त्यामुळे अक्षय नक्की कोण आहेत, त्यांनी मनोरुग्णांच्या सेवेस कशी सुरवात केली, त्यांचे सध्या काम काय सुरू आहे, त्यांना एकदा तुरुंगवारीही करावी लागली आहे. ते कोणते प्रकरण आहे, या विषयी घेतलेला हा आढावा...   

शिरूरमध्ये कोरोनाचा कहर 

जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथील अक्षय मोहन बोऱ्हाडे हे मागील दोन ते अडीच वर्षांपासून मनोरूग्ण व्यक्तींची सेवा करत आहेत. त्यांच्या कुटुंबात ते, त्यांचे वडिल, आई, भाऊ, भावजय व पत्नी, अशा सहा व्यक्ती राहतात. अगदी सुरवातीच्या काळात अक्षय हे जुन्नर येथे सायबर कॅफेमध्ये काम करत होते. त्यावेळी बस स्टॅंन्डजवळ त्यांना दररोज एक मनोरुग्ण व्यक्ती दिसत असे. त्यांना त्याची दया आली व त्यांनी त्यास बिस्कीट पुडा घेऊन दिला. कधी बिस्कीट, कधी भेऴ तर कधी वडापाव, असे पदार्थ ते त्या मनोरुग्णास दररोजच देत असे. त्यामुळे ती व्यक्ती देखील त्यांच्याकडे अपेक्षेने पाहू लागली. अखेर त्यांनी पुण्यातील मनोरूग्णांसाठी काम करणाऱ्या संस्थेबाबत माहिती घेतले. त्यानंतर त्यांनी आपला मित्र विजय बोचरे याच्या मदतीने त्या व्यक्तीस मोटारसायकलवरून संस्थेत नेऊन सोडले. तेव्हापासून असा रुग्ण दिसला की, ते मोटारसायकलवरून त्याला संस्थेत नेऊन सोडायचा. 

या कामात त्यांना सुरुवातीच्या काळात पेट्रोलसाठी पैशाची चणचण भासू लागली. त्यामुळे ते ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांकडे पैशाची मागणी करू लागले. त्यांचे चांगले काम पाहून लोकही त्यांना मदत करू लागले. त्यानंतर त्यांनी शिवऋण या नावे संस्था सुरू केली. त्यामाध्यमातून त्यांना दानशूर व्यक्तींकडून रुग्णवाहिकेसाठी पैसे उपलब्ध झाले. स्थानिक ग्रामस्थ व नागरिक त्यांना देणगी रूपाने पैसे देऊ लागले. फेसबुकच्या माध्यमातून ते देश विदेशातील लोकांपर्यंत पोहचले व मदतीचा ओघ वाढतच गेला. 

आंबेगावकरांची झोप उडणार, 15 जणांना कोरोना 

समाजातून मदत मिळू लागल्यानंतर अक्षय यांनी राहत्या घराच्या गच्चीवरच मनोरूग्ण ठेवायला सुरवात केली. तेथेच ते त्यांचा सांभाळ करू लागले. मनोरुग्णांना रस्त्यावरून आणणे, अंघोळ घालणे, त्यांचे केस कापणे, कपडे देणे, जेवण देणे, या बाबी करत असताना ते त्याचा प्रसार फेसबुकच्या माध्यमातून करत गेले. त्यामूळे त्यांच्या बाबत समाजामध्ये सहानुभती निर्माण झाली व त्यांच्या आर्थिक व वस्तू रूपाने येणाऱ्या मदतीत दिवसागणीक वाढ होत गेली. त्यांच्या मागे फिरणाऱ्या तरुणांची संख्याही वाढत गेली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रुग्णसंख्या वाढल्यावर अक्षय यांनी घरासमोरील शेतात तात्पुरत्या स्वरूपाचे पत्रा शेड उभारले व त्यात त्यांना ठेवले. हळूहळू तेथे भेट देणाऱ्यांची संख्या वाढली, प्रसिद्धी माध्यमांनी देखील त्याची दखल घेतली व त्यांच्या कार्यास प्रसिद्धी दिली. काही दानशूर व्यक्तींकडून मोठे पत्राशेड, पेव्हर ब्लॉक, वॉटर फिल्टर, हिटर, पंखे, कपडे, चादर, ब्लँकेट, किराणा, धान्य, रोख पैसे, अन्नदान या रूपाने पैसे मिळत गेले. कालांतराने त्यांच्याकडील वाहनांच्या संख्येतही भर पडत गेली. 

मात्र, त्यांच्यापासून स्थानिक नागरिकांना त्रास होऊ लागल्याने अनेकांच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे येऊ लागल्या, त्यामध्ये स्थानिक रस्त्यांवर बेदरकारपणे वाहन चालवणे, सोबत असलेल्या तरुणांच्या मदतीने परिसरात दहशत निर्माण करणे, मारहाण करणे, अशा तक्रारी येऊ लागल्या. मृत पावलेल्या व्यक्तींची ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती न देता स्मशानभूमीत विल्हेवाट लावत असे. याबाबत त्यास समज दिली व पोलिसातही तक्रार दिली, परंतु त्यांनी स्थानिक प्रशासनास दाद दिली नाही.

एके दिवशी चारचाकी गाडीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारातून संगमनेर (जि. नगर) येथील युवकांना मारहाण केल्याप्रकरणी अक्षय यांच्यासह आठ जणांवर आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर सर्वजण फरारी झाले. पोलिस त्यांचा शोध घेत होते, परंतु ते हाती लागत नव्हते. ते फरारी असताना २० डिसेंबर २०१९ रोजी त्यांच्यावर बालन्याय अधिनियम कलम २०१५ कलम ४२ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करून त्यांच्या संस्थेतील ५३ मनोरूग्ण हलविले. त्यामध्ये सात लहान मुलांचा समावेश होता. त्यानंतर आळेफाटा पोलिसांनी अक्षय व त्यांच्या साथीदारांना अटक केली. जवळपास तीन महिन्यांनंतर त्यांची येरवडा कारागृहातून जामीनावर सुटका केली. त्यानंतर थोडा अवधी लोटल्यावर त्यांनी पुन्हा मनोरूग्ण आणण्यास सुरुवात केली. आता त्यांच्याकडे जवळपास ४० मनोरूग्ण आहेत. तीन दिवसांपूर्वी त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सत्यशिल शेरकर यांच्यावर आरोप केले. तेव्हापासून ते समाज माध्यमांवर गाजत आहेत. त्यांना अनेकांनी पाठिंबा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Life journey of Akshay Borhade