esakal | खडकवासला: सालाबादप्रमाणे यंदाही खडकवासल्यात 'गोधडी महोत्सव' । Pune
sakal

बोलून बातमी शोधा

गोधडी महोत्सव

खडकवासला: सालाबादप्रमाणे यंदाही खडकवासल्यात 'गोधडी महोत्सव'

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी : फेसबूक, व्हॉट्सऍप, इंस्टाग्राम अशा समाज माध्यमांवर सध्या खडकवासला धरणामागे सुरू असलेल्या अनोख्या महोत्सवाची चर्चा सुरू आहे. या महोत्सवाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर तुफान व्हायरल झाला असून व्हिडिओत दिसणारे मनमोहक दृश्य प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे. हा महोत्सव म्हणजे 'गोधडी महोत्सव' !

हेही वाचा: आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

शारदीय नवरात्रौत्सव जवळ आला की खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला मुठा नदीपात्रातील खडकावर धरणाच्या आजूबाजूच्या गावांतीलच नव्हे तर थेट पुणे शहरातील लोक गोधड्या धुण्यासाठी येतात. रंगीबिरंगी गोधड्या, ब्लॅंकेट्स, चादर व इतर कपड्यांमुळे नदीपात्रातील खडकाचे रूप बदलून जाते.

रस्त्यावरून येणारे-जाणारे लोक क्षणभर थांबून हा अनोखा नजारा पहाण्यात दंग होतात. यावर्षी सात ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरवात होत असल्याने मागील चार-पाच दिवसांपासून खडकवासला धरणामागे नागरिक गोधड्या धुण्यासाठी गर्दी करत आहेत. विशेष म्हणजे दोन दिवसांपासून पावसानेही उघडीप दिल्याने आणि दिवसभर कडक ऊन पडत असल्याने या 'गोधडी महोत्सवास' अधिक रंगत भरल्याचे दिसून येत आहे.

"मला जसं कळतंय तसं अगदी लहान पणापासून आम्ही दरवर्षी नवरात्रीच्या अगोदर खडकवासला धरणामागे गोधड्या धुण्यासाठी येतो. येथे आल्यावर बालपणीच्या आठवणी जाग्या होतात."- सचिन मिरगुंड, नागरिक पर्वती दर्शन.

"पावसाचा जोर कमी झाल्याने सध्या धरणातून विसर्ग बंद आहे. त्यामुळे नागरिकांना कपडे धुवायला जागा मिळत आहे. धरणावरील कर्मचारीही लक्ष ठेवून असतात. नागरिकांनीही काळजी घ्यावी."- राजेंद्र राऊत, खडकवासला धरण शाखा अभियंता.

loading image
go to top