साहित्य महामंडळाच्या कारभाराचा खडखडाट

साहित्य महामंडळाच्या कारभाराचा खडखडाट
Published on: 

पुणे, ता. ६ : एका बैठकीत इतिवृत्तातील त्रुटींमुळे ते संमत झाले नाही... तर पुढच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नसल्याने ताळेबंद नामंजूर... साहित्य संमेलनातील कार्यक्रमांमध्ये पदाधिकाऱ्यांनी सहभागी होण्याचा आग्रह अन् नांदी संमेलनांत अन्य घटक संस्थांकडे दुर्लक्ष... अशा प्रशासकीय त्रुटींमुळे, बैठकींमध्ये वारंवार होणाऱ्या मतभेदांमुळे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या गाडीचा खडखडाट सुरू आहे. घटक संस्थांनी महामंडळाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली असून, अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या ऐतिहासिक १००व्या साहित्य संमेलनाच्या नियोजनालाही विलंब होत आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) नव्या कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर महामंडळाची कार्यकारिणीही बदलली. नवीन पदाधिकाऱ्यांचा महामंडळाच्या कार्यकारिणीवरील हा पहिलाच कार्यकाळ असल्याने प्रशासकीय बाबी समजून घेण्यासाठी वेळ लागेल, ही भूमिका घेत अन्य घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांनी सुरुवातीला सहकार्याची भूमिका घेतली. मात्र, जवळपास प्रत्येक बैठकीत मतभेद आणि वादावादीचे प्रसंग घडत असल्याने, तसेच प्रशासकीय चुका वारंवार होत असल्याने आता घटक संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शंभराव्या साहित्य संमेलनानिमित्त विविध ठिकाणी ९९ नांदी संमेलने होत आहेत. यातील काही संमेलने घटक संस्थांच्या कार्यक्षेत्रात होत असतानाही त्यांना विचारात घेतले नाही. त्यामुळे या संस्था नाराज आहेत. महामंडळाची एक बैठक खर्च टाळण्यासाठी अन्य संस्थांचा विरोध असतानाही ऑनलाइन पद्धतीने घेतली. या बैठकीत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वर्धापन दिन कार्यक्रमात अथवा साहित्य संमेलनात वक्ता म्हणून सहभागी होण्यावर चर्चा झाली. त्यावर काहींनी संकेतानुसार असे सहभागी होत नाहीत, असे सांगितल्यावर त्यावर वाद झाले, तसेच याच बैठकीत सादर झालेल्या इतिवृत्तात चुका असल्याने ते नामंजूर करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी झालेल्या महामंडळाच्या बैठकीत ताळेबंदाचा तपशीलवार आढावा सादर न करता दोन पानी संक्षिप्त ताळेबंद मांडण्यात आला. त्यावर संबंधित पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्याही नसल्याने तो नामंजूर करण्यात आला, तसेच बैठकीच्या विषयपत्रिकेत अंदाजपत्रकाचा समावेश केला नव्हता. आयत्या वेळचा विषय म्हणून अंदाजपत्रक मांडण्यात आले; मात्र तेही मंजूर झाले नाही. महामंडळाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे असलेल्या प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांचेच भाषण महामंडळाच्या अध्यक्षांनी पूर्ण ऐकले नाही. ठाले-पाटील यांनी या वेळी फलकांवरील शुद्धलेखनाच्या चुकांसह वर्धापन दिनाच्या चुकीच्या क्रमांकावरूनही पदाधिकाऱ्यांचे कान टोचले.

संमेलनाच्या नियोजनाचे आव्हान :
ऐतिहासिक शंभराव्या साहित्य संमेलनासाठी आता केवळ तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र, त्याच्या नियोजनाबाबत ठोस पावले पडलेली नाहीत. संमेलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी महामंडळाच्या मार्गदर्शक समितीची बैठक २३ नोव्हेंबरला होणार आहे. परंतु, राष्ट्रीय पातळीवरील साहित्यिकांना, तसेच मान्यवरांना निमंत्रित करायचे असल्यास त्यांच्या तारखा काही महिने आधी निश्‍चित कराव्या लागतात. त्यामुळे या विलंबाचा फटका निश्‍चितच संमेलनाच्या नियोजनाला बसेल, अशी भीती एका समाविष्ट संस्थेच्या पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केली.

‘पदाधिकाऱ्यांनी निदान घटना तरी वाचावी’ :
‘‘साहित्य महामंडळावरील पदाधिकाऱ्यांचा पहिलाच कार्यकाळ असल्याने त्यांना वेळ नक्कीच द्यायला हवा. मात्र, प्रत्येक बैठकीत होणाऱ्या प्रशासकीय चुका या गांभीर्याचा अभाव दर्शवतात. आम्ही काही काळापूर्वीच महामंडळाची घटना पूर्ण वाचण्याचा सल्ला दिला होता. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीतील चुका बघता त्यांनी अजूनही घटना वाचलेली नाही. पदाधिकाऱ्यांचा मंचीय कार्यक्रमांचा अट्टहासदेखील अयोग्य आहे,’’ असे मत मराठवाडा साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष व महामंडळाचे सदस्य डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी व्यक्त केले.

‘‘साहित्य महामंडळाच्या बैठका अतिशय खेळीमेळीत होत असून कोणत्याही प्रशासकीय बाबींमध्ये त्रुटी नाहीत. शंभराव्या साहित्य संमेलनाच्या नियोजनाचे कामही सुरू आहे.’’
- योगेश सोमण, अध्यक्ष, साहित्य महामंडळ

Marathi News Esakal
www.esakal.com