esakal | नसरापूर : चालकाकडून गावठी पिस्तूल जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

नसरापूर : चालकाकडून गावठी पिस्तूल जप्त

नसरापूर : चालकाकडून गावठी पिस्तूल जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नसरापूर : सारोळा (ता. भोर) येथील महामार्गावर उड्डाणपुलाखाली इनोव्हा मोटारसह थांबलेल्या प्रवासी मोटार चालकाकडून गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त केले. वृषभ तानाजी बागल (वय २२, रा. रानमळा, कातरखटाव, ता. खटाव, जि. सातारा) असे अटक केलेल्या मोटार चालकाचे नाव असून, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक अमोल शेडगे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत फरारी गुन्हेगारांचा शोध घेत असताना रविवारी (ता. १२) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास गोपनीय बातमीदारामार्फत सारोळा पुलाखाली एक सिल्व्हर रंगाची इनोव्हा मोटार संशयितरीत्या थांबल्याची माहिती मिळाली. त्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अमोल गोरे, हवालदार कारंडे, राजू मोमीन, पोलिस नाईक अमोल शेडगे, पोलिस शिपाई निकीता गुंड आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने या मोटारजवळ जाऊन चौकशी केली. त्यावेळी चालक वृषभ बागल यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने मोटारची झडती घेतली. त्यावेळी गाडीच्या डिकीमध्ये परवाना नसताना एक गावठी पिस्तूल आढळून आले. त्यावर बागल यास ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत ३५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, १०० रुपयांचे पिस्तूल, एक काडतूस, ४ लाख रुपये किमतीची इनोव्हा गाडी (क्र.एम एच ०४ इ एच ४९९८) व ६ हजार रुपये किमतीचा मोबाईल हॅन्डसेट, असा ऐवज जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीस राजगड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला सोमवारी (ता. १३) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. याबाबतचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे हे करत आहेत.

loading image
go to top