"लिज्जत'च बचत गटांचा जनक : प्रकाश जावडेकर

"लिज्जत'च बचत गटांचा जनक : प्रकाश जावडेकर
Updated on

पुणे : "महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने महिला बचत गटांची संकल्पना अमलात आणली; पण ही संकल्पना अगदी अलीकडच्या काळातील आहे. लिज्जत पापड गृहउद्योगच बचत गटांच्या संकल्पनेचा खरा जनक आहे,'' असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी व्यक्त केले. 

श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडच्या सुवर्णमहोत्सवी समारंभात ते बोलत होते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार अध्यक्षस्थानी होते. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, वनराईचे अध्यक्ष गिरीश गांधी, डॉ. कुमार सप्तर्षी, लिज्जतच्या संस्थापिका जसवंती बेन, अध्यक्षा स्वाती पराडकर, उपाध्यक्ष प्रतिभा सावंत, संचालक सुरेश कोते, सुमन दरेकर, कमल कोळगे, विमल कांबळे, रत्नमाला जाधव, मंदाकिनी दाखवे, चेतना नहार आदी उपस्थित होते. 

जावडेकर म्हणाले, ""महिलांमध्ये पुरुषांपेक्षा सातत्य, वात्सल्य, शिस्त आणि स्वाभिमान हे चार विशेष गुण असतात. त्यांच्यातील अंगभूत कौशल्य ओळखून लिज्जत पापड उद्योगाने त्यांना ओळख दिली आणि स्वावलंबी बनवले. मेहनत आणि स्वाभिमानाच्या जोरावर गरीब व्यक्तीही मोठ्या पदावर जाऊ शकतो, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे.'' 

पवार म्हणाले, ""महिला सक्षमीकरणासाठी लिज्जत पापड गेली 50 वर्षे काम करीत आहे. सात महिलांपासून सुरू झालेला हा प्रवास आज 50 हजार महिलांपर्यंत आणि 1 हजार 600 कोटी रुपयांच्या उलाढालीपर्यंत पोचला आहे. या उद्योगामुळे देशाला दरवर्षी 70 कोटी रुपयांचे परकी चलन मिळत आहे, ही कौतुकाची गोष्ट आहे.'' 

या वेळी विद्याधर अनास्कर, देवता अंधुरे-देशमुख, डॉ. मनीषा पोतदार, संजय नहार, मुक्ता पुणतांबेकर, कर्नल हेमंत दरेकर, राहुल देशमुख, डॉ. मिलिंद भोई, सचिन इटकर, पत्रकार अलका धूपकर, हालिमा कुरेशी यांना "लिज्जत रत्न' पुरस्काराने गौरविण्यात आले. पराडकर यांनी प्रास्तविक व्यक्त केले. 

"एक्‍झिट'पेक्षा "एक्‍झॅक्‍ट पोल' महत्त्वाचे

एक्‍झिट पोल ही एक चर्चा आहे. ही चर्चा खुशाल व्हावी. मात्र, अकरा तारखेला खरे चित्र समोर येणार असून, एक्‍झिटपेक्षा एक्‍झॅक्‍ट पोल महत्त्वाचा आहे, असे म्हणत जावडेकर यांनी एक्‍झिट पोलवर होणाऱ्या चर्चेला पूर्णविराम दिला. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने एक्‍झिट पोल कॉंग्रेसच्या बाजूने झुकलेले पाहायला मिळत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर जावडेकर यांनी कार्यक्रमांनंतर पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com