
पुणे : लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू झाला, मात्र शहरातील विविध रस्त्यांवरील चित्र मात्र उलटले आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांवर आज सकाळपासूनच वर्दळ पाहायला मिळाली. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची वेळ येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गेली दोन दिवस रोज दोनशेपेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. मात्र, तरीही नागरिक बिनधास्त रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र चिंताजनक आहे. सोशल डिस्टनसिंगचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुणेकरांनो, हे वागणं बरं नव्हं, असंच म्हणावे लागेल.
पुणेकरांनो, हे वागणं बरं नव्हं... शहरातील रस्त्यांवर आज सकाळपासूनच वाहनांची गर्दी होती. दुपारी एक वाजताही रस्त्यावरील गाड्यांची संख्या वाहतूक कोंडी करणारी आहे. दुकाने खुली असल्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. पेट्रोलपंपावरही गाड्यांच्या रांगा दिसत होत्या. तसेच. दारूच्या दुकानांसमोर अजूनही गर्दी कायम आहे. रेशनच्या दुकानांसमोर होणारी गर्दी चिंताजनक आहे. शहरात वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेता नागरिकांनी अत्यंत खबरदारीने घराबाहेर पडायला हवे. शहरात रोजच अशी गर्दी वाढत गेली; तर कोरोनाचा प्रसार वाढू शकतो.
सातारा रस्त्यावर वर्दळ
सातारा रस्त्यावर कात्रज ते स्वारगेट चौकापर्यंत नियमित वाहतूक सुरू झाल्याचे सकाळी दिसले. वाहतूक कोंडी होण्याएवढी परिस्थिती नसली, तरी चौका-चौकात वर्दळ जाणवण्याइतपत वाढली आहे. स्वारगेट चौकातील उड्डाणपुलावरही वर्दळ आहे. बिबवेवाडी, सहकारनगर, पर्वती पायथा आदी ठिकाणांहून सातारा रस्त्यावर वाहतूक येत आहे.
बाजीराव रस्त्यावर दुहेरी वाहतूक
अभिनव चौकात बाजीराव रस्त्याकडे बॅरिकेड्स लावले आहेत. त्यामुळे टिळक रस्ता अथवा अंतर्गत रस्त्यांचा वापर केला जात आहे. बाजीराव रस्त्या एरव्ही एकेरी वाहतुकीचा आहे. मात्र, गेल्या दोन महिन्यांतील लॉकडाउनमुळे रस्त्यावरील वाहतूक बंद झाली. लॉकडाउनच्या काळात रिकाम्या रस्त्यावर दुहेरी वाहतूक होत राहिली. आज सकाळपासून या रस्त्यावर दुहेरी वाहतूक आहे. शनिवार वाड्याच्या चौकात शिवाजी रस्त्यावर बॅरिकेड्स असल्यामुळे वाहनचालक बाजीराव रस्त्याचा वापर करीत आहेत.
मार्केट यार्डात वाहतूक कोंडी
गुलटेकडी मार्केट यार्डातील आठ व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. गूळ भुसार विभाग उद्यापासून (मंगळवार) बंद आहे. त्यामुळे या विभागात धान्य आणि किराणा मालाच्या खरेदीसाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडाली आहे. कुठेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. शहरातील आणि जिल्ह्यातील किराणा दुकानदार खरेदीसाठी मार्केट यार्डात आले आहेत. त्यामुळे बाजारात सर्वत्र वाहतूक कोंडी झाली आहे.
पौड रस्त्यावर खरेदीसाठी गर्दी
पौड रस्ता आणि कर्वे रस्त्यावर सकाळपासूनच वाहतूक सुरू आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडले असले; तरी सोशल डिस्टसिंगचे पालन करत आहेत. किराणा माल, लॉन्ड्री, दूध, औषधे आदी दुकाने सुरू झाली असून, येथे नागरिक रांगेत उभे राहूनच खरेदी करीत आहेत. मेट्रोचे काम आणि ड्रेनेजचे काम सुरू असलेल्या ठिकाणी एकेरी वाहतूक केली आहे. तेथे वाहतूक कोंडी होत आहे. या भागात जागोजागी भाजी विक्रेते आणि फळ विक्रेते स्टॉल उभारून विक्री करीत आहेत. पौड रस्त्यावरील कपड्यांची दुकाने, सायकलची दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे तेथे नागरिकांची वर्दळ वाढली आहे.
औंध परिसरात गर्दी
औंध, पाषाण, खडकी आणि विद्यापीठ रस्त्यावर आज गर्दी पाहायला मिळाली. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीला आलेल्यांसह प्रवासाला बाहेर पडलेले नागरिकही त्यामध्ये दिसत होते. शिवाजीनगर- विद्यापीठ रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावर आज वाहनांची नेहमीपेक्षा जास्त गर्दी दिसत होती. संचेती चौकात तीनही बाजूने मुख्य शहरात जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांबरोबरच चारचाकी वाहनांची गर्दी जास्त होती. तसेच, घराबाहेर खरेदीसाठी पायी बाहेर पडलेले नागरिकही दुपारी एक नंतरही रस्त्यावर होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.