पुण्याच्या लॉकडाउनबाबत सरकारने घेतलाय महत्त्वाचा निर्णय...

lock down
lock down

पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यात प्रंचड वेगान वाढणारा कोरोना आटोक्यात आणण्यासाठी येत्या सोमवारपासून (ता. 13) संपूर्ण पुणे जिल्ह्यात पुन्हा कडकडीत लॉकडाउन करण्याचा सरकारचा विचार सुरू आहे. त्यासाठी पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर नियम मोडणाऱ्यांची गय करायची नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.  

पुणे व पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यात रोज कोरोनाचे नवीन सरासरी हजारच्या घरात रुग्ण  सापडत आहेत. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच संख्याही मोठी आहे. त्याचवेळी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार जोरात सुरू आहे. दौंड, सासवड या शहरांतील कोरोनाचा वेग चिंताजनक आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात येत्या सोमवारपासून (ता. 13) लॉकडाउन करण्याचा सरकारचा विचार सुरू आहे. याबाबतची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.  

पुणे येथील विधान भवनच्या 'झुंबर हॉल'मध्ये शुक्रवारी कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते.विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. 

कोरोनाचा वेग जास्तीचा असला तरी नागरिकांकडून सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडवला जात आहे. रस्त्यावरही गर्दी वाढत आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नाही. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यांनतर कोरोनाचा प्रसार वाढत येत आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने अधिक प्रयत्न करावेत. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सरकारच्या निर्देशानुसार कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, अशा सूचना पवार यांनी दिल्या.

ॲक्सिस बँकेतर्फे 40 लाखांचा धनादेश  सुपूर्द 
ॲक्सिस बँकेतर्फे उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍याकडे 'कोरोना' विरुद्धच्या लढ्यासाठी 40 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्‍यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोरोनाविरुध्‍द लढ्यासाठी ही मदत देण्‍यात आली आहे. तसेच, कोरोना लढ्यासाठीचे इतर साहित्‍य उपमुख्‍यमंत्री पवार यांच्‍याकडे सुपूर्द करण्‍यात आले. ॲक्सिस बँकेचे अध्‍यक्ष रवी नारायणन, आयडीबीआयचे क्षेत्रीय महाव्‍यवस्‍थापक संजय पणीकर या वेळी उपस्थित होते.

 Edited by : Nilesh Shende

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com