esakal | Pune : बदलत्या आव्हानांसाठी लोहगाव एअर फोर्स स्टेशन मोलाचे ठरत आहे; भूषण गोखले
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-Airport

बदलत्या आव्हानांसाठी लोहगाव एअर फोर्स स्टेशन मोलाचे ठरत आहे; भूषण गोखले

sakal_logo
By
अक्षता पवार

पुणे - भारतीय हवाईदलाच्या पहिल्या तीन महत्त्वपूर्ण (विंग) तळांमध्ये पुण्यातील लोहगावच्या एअर फोर्स स्टेशनचा समावेश होतो. देशाच्या भौगोलिक, सामरिकआणि प्रशिक्षणाच्या दृष्टीने हवाईदलासाठी हे महत्त्वपूर्ण स्टेशन असून हे देशात ‘नंबर २ विंग’ म्हणून संबोधले जाते. दुसऱ्या महायुद्धापासून ते स्वातंत्र्यानंतरच्या काळातील विविध युद्धांमध्ये पुण्यातील या एअर फोर्स स्टेशनने महत्त्वाची भूमिका बजावली असून येत्या काळातही बदलत्या आव्हानांसाठी लोहगाव एअर फोर्स स्टेशनची मोलाचे ठरत आहे, असे मत ‘सकाळ’शी बोलताना एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी व्यक्त केले.

दरवर्षी ८ ऑक्टोबर हवाईदल दिन म्हणून साजरा केला जातो. त्याअनुषंगाने गोखले यांच्याशी सकाळने संवाद साधला. हवाईदलाच्या दृष्टीने पुण्याचे महत्त्व येत्या काळातील युद्ध सज्जता आदींबद्दल त्यांनी माहिती दिली. गोखले म्हणाले की, स्वातंत्र्या पूर्वी भारतीय हवाई दल हे ‘रॉयल इंडियन एअर फोर्स’ म्हणून ओळखले जात होते. तर ब्रिटिश काळात ब्रिटन किंवा अमेरिकेतून येणारी विमानांसाठी पुण्यातील एअर फोर्स स्टेशनचा वापर ‘स्टेजिंग बेस’ म्हणून केला जात होता. स्वातंत्र्यानंतर देखील याच हवाईतळाच्या माध्यमातून विविध मोहिमा राबविण्यात आल्या. प्रशिक्षणापासून ते मदतकार्यापर्यंत पुणे एअर फोर्स स्टेशनने महत्त्वाचे योगदान दिले आहे.’’

हेही वाचा: महाविद्यालयांच्या शुल्क निश्चितीच्या प्रस्तावांना मुदतवाढ

महत्त्व का?

- फ्रंटलाइन व ‘इनडेप्थ’ हवाईतळ म्हणून आज पुणे एअर फोर्स स्टेशन मोलाची कामगिरी करत आहे

- शत्रू देशांच्या समुद्री हल्ल्यापासून नौदलाला मदत पुरविणे

- विविध प्रकारच्या विमानांचे प्राथमिक प्रशिक्षण देणे

- आपत्तीकाळात नागरिकांना मदतकार्य पोचविणे

- कोरोनाकाळात ऑपरेशन संजवीनीत मोठा सहभाग

- देशांतर्गत व मित्र देशांना लशींचा पुरवठा करणे

क्रॉस रन-वे

या एअर फोर्स स्टेशनमध्ये ‘क्रॉस रन-वे’ देखील आहे. परंतु काळानुसार याचा वापर कमी झाला असून आता केवळ विमानांना येथे पार्क केले जात आहे. या क्रॉस रन-वे चा वापर आजही केला जात असता तर नक्कीच खासगी विमानांसह हवाईदलाच्या विमानांचे उड्डाणे अधिक सुरळीत ठेवणे शक्य झाले असते.

हवाई प्रशिक्षणाचे केंद्र

पुणे हे पाकिस्तान, चिनपासून देशाच्या आतमध्ये आहे. त्यामुळे शत्रू देशाला थेट हल्ला करणे अवघड जाते. शत्रूला पुणे स्थित एअर फोर्स स्टेशनपर्यंत पोचण्यासाठी भला मोठा पल्ला गाठावा लागतो. त्यामुळे भारतीय हवाईदलाला भौगोलिक व सामरिकदृष्ट्या पुण्याचा हा फायदा आहे. येथे विविध प्रकारचे प्रशिक्षण येथे दिले जात आहे. यासाठी मिग २१, मिग २९, सुखोई -३० या सारखी विमाने हे पहिल्यांदा पुण्यातच दाखल होता. तसेच त्याचे प्रशिक्षण देखील येथे देण्यात येते. तसेच त्याचे प्रशिक्षण देखील येथे देण्यात आले. सध्या सुखोई-३० या लढाऊ विमानाचे प्रशिक्षण स्कॉड्रन या एअर फोर्स स्टेशन येथे आहे.

हेही वाचा: लखीमपूर घटनेबाबत खंबीर भूमिका घेतल्यानं राज्यात छापासत्र

विविध युद्धामध्ये ‘२ विंग’चा सहभाग

- दुसऱ्या महायुद्धात मस्किटो, स्पिटफायर, लिब्रेटर सारखे लढाऊ विमाने पुणे एअर फोर्स स्टेशनवर तैनात होती, येथून ते बरमा किंवा अफगानिस्तान येथे होणाऱ्या युद्धांसाठी

- हैदराबादच्या मुक्ती संग्रामासाठी सप्टेंबर १९४८ ‘ऑपरेशन पोलो’मध्ये पुण्यातील टेम्पेस्ट विमानांनी भाग घेतला होता

- १९६१ साली ऑपरेशन विजय अंतर्गत गोवा, दमन ॲण्ड दीव मुक्ती करण्याकरिता पुण्यातील हवाईदलातील वॅम्पायर, कॅनबेरा, हंटर सारख्या लढाऊ विमानांचा वापर झाला

- १९६२ व १९७१ च्या युद्धात पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी पुण्यातून कॅनबेरा बॉम्बर विमानांचा वापर

हवाई मार्गानेच इंधन पुरवठा

पूर्वी पुण्यातून ‘कॅनबेरा’ हे विमान पाकिस्तानच्या दिशेने जात कराची येथे बॉम्बींग करून परतताना जोधपूर येथे इंधन भरण्यासाठी थांबत होते. तसेच युद्ध परिस्थिती दरम्यान अनेकवेळा लढाऊ किंवा बॉम्बर विमानांना पुन्हा इंधन भरण्यासाठी ठराविक अंतरावरील एअर बेसवर जावावे लागत होते. पण आता हवाईदलाला हवेतल्या हवेत इंधन भरण्याची क्षमता असल्यामुळे पुणे एअर फोर्स स्टेशनवरील सुखोई ३० सारखी विमाने पाकिस्तानवर हल्ला करून हवेतल्या हवेत इंधन भरून परत पुण्यात येऊ शकतात.

‘हवाईदलात रुजू झाल्यावर मला सर्वांत प्रथम काम करण्याची संधी मिळाली ती पुण्यातील एअर फोर्स स्टेशन येथे. त्यावेळी मी वॅम्पायर जेट फायटर विमान उडवत होतो. त्यावेळी सुपर कॉन्स्टिलेशन, कॅनबेरा अशा वेगवेगळी विमाने देखील पुण्यातून उड्डाण करायचे. महत्त्वाची बाब म्हणजे सर्व नवीन प्रकारची विमाने या एअर फोर्स स्टेशनने कधी ना कधी तरी बघीतली आहेत.’

- भूषण गोखले, एअर मार्शल (निवृत्त)

loading image
go to top