esakal | लोहगाव विमानतळावर प्रवाशांचे मोठे हाल
sakal

बोलून बातमी शोधा

lohegaon-airport

विमान उड्डाणासाठी आधी सहा तासांची प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर विमान रद्दचीच घोषणा झाली. हा प्रकार लोहगाव विमानतळावर बुधवारी (ता. ४) घडला. पुण्यावरून कोलकत्याला जाणाऱ्या प्रवाशांनी याबाबत संताप व्यक्त केला.

लोहगाव विमानतळावर प्रवाशांचे मोठे हाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - विमान उड्डाणासाठी आधी सहा तासांची प्रतीक्षा करावी लागली. त्यानंतर विमान रद्दचीच घोषणा झाली. हा प्रकार लोहगाव विमानतळावर बुधवारी (ता. ४) घडला. पुण्यावरून कोलकत्याला जाणाऱ्या प्रवाशांनी याबाबत संताप व्यक्त केला.

स्पाइस जेटचे (एसजी २७५) पुण्याहून कोलकत्याला जाणारे विमान नियोजित वेळेनुसार दुपारी एकला उडणे अपेक्षित होते. या विमानासाठी प्रवासी सकाळी अकरापासून विमानतळावर दाखल झाले होते. ‘चेक-इन’ची सर्व प्रक्रिया पार पाडून ‘बोर्डिंग’च्या प्रतीक्षेत होते. मात्र, उड्डाणाची वेळ झाल्यानंतरही प्रवाशांना विमानात सोडले नाही. विमान कंपनीकडून उड्डाणाची वेळ ठरावीक अंतराने पुढे ढकलण्यात येत होती. त्यावर प्रवाशांनी कंपनी प्रशासनाकडे विचारणा केल्यावर तांत्रिक कारणामुळे उड्डाणाला विलंब झाल्याचे सांगण्यात आले. तसेच, विमानाला पक्ष्याची धडक बसल्याचा प्रकार घडल्यानेही विलंब झाला, असे विमान कंपनीकडून सांगण्यात आले.

इतर विमानांनाही उशीर
स्पाइस जेटचे पुणे-बेंगळुरू (एसजी-५१७) हे विमान नियोजित वेळेनुसार दुपारी पावणेचारला उडून सायंकाळी सव्वापाचला बेंगळुरूला पोचणे अपेक्षित होते. मात्र, या विमानाला एक तास ११ मिनिटांचा विलंब झाला. त्यामुळे पाचच्या सुमारास उडाले आणि सहा वाजून २६ मिनिटांनी बेंगळुरूला पोचले. स्पाइस जेटच्याच गोव्याला जाणाऱ्या विमानाला (एसजी ५१६) एक तास ११ मिनिटांचा उशीर झाला. एअर इंडियाच्या (एआय ९५६२) या विमानाला एक तास १० मिनिटे आणि गो-एअरच्या बेंगळुरू विमानाला ४५ मिनिटे विलंब झाला. त्यामुळे लोहगाव विमानतळावरील प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली.

loading image
go to top