Loksabha 2019 : प्रशासनही एक पाऊल पुढे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

व्होटर स्लिपवरील माहिती

  • मतदाराचे छायाचित्र 
  • मतदार यादीतील अनुक्रमांक 
  • मतदान केंद्राचा पत्ता 
  • मतदान केंद्रावर जाण्यासाठीचा मॅप 
  • मतदानाची वेळ 

पुणे - लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने मतदारांना छायाचित्र मतदार ओळखपत्राचे (फोटो व्होटर स्लिप) वाटप करण्यास सुरवात केली आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे मतदारांना घरी जाऊन व्होटर स्लिप देत आहेत. पुणे व बारामती मतदारसंघातील ४१ लाख ८७ हजार मतदारांना फोटो व्होटर स्लिपचे वाटप करण्यात येणार आहे. या स्लिपवर बीएलओ यांचे नाव आणि मोबाईल नंबर, मतदान केंद्राचा पत्ता, मॅप, मतदार यादीतील अनुक्रमांक आदींच्या माहितीबरोबरच सूचनाही दिल्या आहेत.

पुणे व बारामती लोकसभा निवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानाची प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी, बोगस मतदानाला आळा बसावा, या हेतूने प्रत्येक मतदाराला फोटो व्होटर स्लिप देण्याचे निवडणूक आयोगाने ठरविले आहे. यापूर्वी उमेदवारच मतदारांना स्लिप देत होते. तसेच, मतदान कक्षात जाताना त्या स्लिपवर असलेले उमेदवाराचे नाव व निवडणूक चिन्ह होते.

त्यामुळे त्यावर बंदी आहे. ही बाब विचारात घेऊन आयोगाने मतदारांना फोटो व्होटर स्लिप देण्याचा उपक्रम मागील लोकसभा निवडणुकीपासून हाती घेतला आहे. विधानसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी यांनी फोटो व्होटर स्लिपची छपाई केली आहे. मतदान केंद्रनिहाय त्याचे गठ्ठे तयार केले आहेत. याचे वितरण बीएलओ यांना केले आहे. बीएलओ घरी जाऊन फोटो व्होटर स्लिपचे वाटप करीत आहेत.

मतदारांसाठी सूचना 
  महिला व ज्येष्ठांसाठी स्वतंत्र रांग
  मतदानाच्या शेवटी रांगेतील सर्व मतदारांना मतदान करण्याची अनुमती
  विशिष्ट उमेदवाराला मत, मतदारांना पैसे देणे किंवा इतर कोणतीही स्वीकृती देणे किंवा स्वीकारणे हे कायद्यांतर्गत भ्रष्ट आचरण

Web Title: Loksabha Election 2019 Administrative Voter Photo Voter Slip