Loksabha 2019 : पदयात्रा, सभांतून प्रचाराची सांगता

Police
Police

पिंपरी - मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता. २९) मतदान होणार आहे. त्यामुळे शनिवारी (ता. २७) सायंकाळी सहा वाजता प्रचार संपला. मात्र, ४३ अंशांवर पोचलेल्या तापमानाची पर्वा न करता शहरातील सुमारे साडेबारा लाख मतदारांपर्यंत पोचण्यासाठी महायुती आणि महाआघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले. घामाघूम होत पदयात्रा, प्रचार फेरीत सहभागी झाले.

लोकसभेसाठी मावळमधील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे व महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी गेल्या काही दिवसांत ज्येष्ठ नेत्यांच्या सभा झाल्या. पदयात्रा, प्रचार फेऱ्या, कोपरा सभा, बैठका, मेळाव्यांवर दोन्ही उमेदवारांनी भर दिला. अन्य पक्षांच्या व अपक्ष उमेदवारांनीही आपापल्यापरीने मतदारांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला. 

राष्ट्रीय व स्थानिक मुद्दे 
राज्याची राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे यांना जोडणारा दुवा म्हणजे मावळ लोकसभा मतदारसंघ. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू, तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना महाआघाडीने दिलेली उमेदवारी व त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य यामुळे मावळकडे सर्वांचे लक्ष आहे. यामुळे प्रचारातही महायुती आणि महाआघाडीकडून मतदार संघातील गावे, शहरांच्या विकासापासून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडीपर्यंतचे मुद्दे आले. यात मावळातील वाड्या-वस्त्यांचे तहानलेपण, औद्योगिकनगरीचा विकास, उरणजवळील जेट्टी, नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ, माथेरानची ट्रेन, पुणे-मुंबईला जोडणाऱ्या लोहमार्गाचे तीन व चौपदरीकरण, पुणे-पिंपरी-चिंचवडचा संयुक्त मेट्रो प्रकल्प आदी मुद्यांचा समावेश होता. तसेच, महायुतीच्या नेत्यांनी केंद्र व राज्य सरकारने केलेली विकासकामे, विविध योजना, लष्करी कारवाई, स्थानिक व बाहेरचा उमेदवार आदी मुद्दे प्रचारात मांडले. तर, महाआघाडीच्या नेत्यांनी राफेल, नीरव मोदी, मल्ल्या, नोटाबंदी, जीएसटी आदी मुद्यांवर भर दिला. 

सोशल मीडियावर भर
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुती व महाआघाडीतर्फे सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करण्यात आला. दोन्ही बाजूच्या मित्र पक्षातील नेते, आजी-माजी पदाधिकारी यांच्या आवाजातील संदेश मोबाईलद्वारे मतदारांपर्यंत पोचविले. ‘नमस्कार, मी... बोलतोय. आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी.... पक्षाच्या.... उमेदवाराला मतदान करून विजयी करा,’ असे आवाहन संदेशांद्वारे केले जात होते. तसेच, फेसबुक, व्हॉटस्‌ॲप, ट्‌विटर अशा माध्यमातूनही प्रचारावर भर दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com