लोणावळ्यामध्ये टपऱ्यांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

लोणावळा - लोणावळ्यात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्‍वभूमीवर नगर परिषद व पोलिसांनी वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या व हातगाड्यांवर मंगळवारी (ता. ४) कारवाई केली. 

लोणावळा - लोणावळ्यात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्‍वभूमीवर नगर परिषद व पोलिसांनी वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या टपऱ्या व हातगाड्यांवर मंगळवारी (ता. ४) कारवाई केली. 

सध्या पर्यटनाचा हंगाम जोरात असल्याने लोणावळा, खंडाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्गासह, भुशी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे तासन्‌तास कोंडीत अडकल्याने पर्यटक व स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर नगर परिषदेच्या वतीने लोणावळा परिसरातील अनधिकृत टपरीधारकांवर कारवाई करण्यात आली. गवळीवाडा येथून कारवाईस सुरवात झाली. गवळीवाडा, रायवूड, सहारा पूल, भुशी धरण परिसरात रस्त्यावर उभारण्यात आलेल्या टपऱ्या, हातगाड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. उपविभागीय पोलिस अधिकारी ज्ञानेश्‍वर शिवथरे, पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव, मुख्याधिकारी सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण कारवाई करण्यात आली.

रस्ता वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई होणारच अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली.

 वाहतूक कोंडीचा फटका सामान्यांनाही बसत असून यापुढे कडक कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांच्या मदतीला नगर परिषदेने वीस ट्रॅफिक वॉर्डन पोलिसांनी मदतीसाठी देण्यासाठी निविदा काढली आहे. याचबरोबर लोणावळा, खंडाळा, वळवण, तुंगार्ली परिसरात नगर परिषदेच्या व खासगी अशा २८ ठिकाणी पर्यटकांसाठी वाहनतळांची सुविधा (पे अँड पार्क) करणार असल्याचेही ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lonavala pune news crime on tapari