esakal | नारायण राणेंच्या पत्नी, मुलाविरोधात लुकआऊट सर्क्युलर जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

Narayan Rane

नारायण राणेंच्या पत्नी, मुलाविरोधात लुकआऊट सर्क्युलर जाहीर

sakal_logo
By
अमित उजागरे

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ६५ कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड न केल्याबद्दल पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि मुलगा आमदार नितेश राणे यांच्याविरोधात लुकआऊट सर्क्युलर जाहीर केलं आहे. दिवाण हाऊसिंग फायनान्स प्राव्हलेट लिमिटेड (DHFL) या कंपनीनं याबाबत तक्रार दिली होती.

आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं DHFL कडून २५ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. या कंपनीच्या नीलम नारायण राणे या सहअर्जदार होत्या. तसेच निलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं ४० कोटी रुपयांचं कर्ज DHFL कडून घेतलं होतं. या दोन्ही कर्जाची परतफेड न केल्यानंतर त्यांच्याविरोधात DHFLनं पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर पुणे पोलिसांना यासंदर्भात ३ सप्टेंबर रोजी लुकाऊट सर्क्युलर जाहीर केलं. पण लुकआऊट सर्क्युलर हे गुन्ह्यासंदर्भात नसून संबंधित थकबाकीदारावर नजर ठेवण्यासाठी असतं.

दरम्यान, हे लुकआऊट सर्क्युलर पुणे पोलिसांकडून छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाकडं पाठवलं आहे. कर्ज बुडवून राणे कुटुंबीय भारताबाहेर जाऊ शकतात अशी भीती DHFLला असल्यानं त्यांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली होती. त्यानंतर तक्रारीवरुन पोलिसांनी हे सर्क्युलर जाहीर केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

लुकआऊट सर्क्युलरला हायकोर्टात आव्हान देणार - नितेश राणे

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, "पुणे पोलिसांनी काढलेलं लुकआऊट सर्क्युलर म्हणजे त्यांनी एअरपोर्ट ऑथेरिटिला मी आणि माझी आई देश सोडून जाऊ शकतो असं सांगितलं आहे. दुसरा मुद्दा असा की, हे सर्क्युलर पुणे पोलिसांनी काढलं आहे. आमचं DHFL मधलं खातं हे मुंबईतलं आहे. मग पुणे क्राईम ब्रान्चनं कुठल्या आधारावर हे सर्क्युलर काढलं? तिसरा मुद्दा असा की, पाच महिन्यांपूर्वीच आम्ही संबंधीत बँकेला आम्हाला पूर्ण कर्ज भरायचं आहे, असं अधिकृत पत्र दिलेलं आहे, त्यामुळे यानंतर असं सर्क्युलर काढण्याला अर्थ नाही. याविरोधात आता आम्ही हायकोर्टात आव्हान देणार आहोत"

loading image
go to top