उसाला लागलाय लॉकडाउनरूपी कोल्हा... 

हितेंद्र गद्रे
सोमवार, 25 मे 2020

कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेला दौंड तालुक्‍यातील गुऱ्हाळ व्यवसाय सध्या अडचणीत आला आहे. गुऱ्हाळे प्रामुख्याने परप्रांतीयांकडून चालवली जात होती. मात्र,

यवत (पुणे) : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेला दौंड तालुक्‍यातील गुऱ्हाळ व्यवसाय सध्या अडचणीत आला आहे. गुऱ्हाळे प्रामुख्याने परप्रांतीयांकडून चालवली जात होती. मात्र, लॉकडाउनमुळे बहुतांश परप्रांतीय आपापल्या राज्यात निघून गेल्याने तालुक्‍यातील 80 टक्‍क्‍यांहून अधिक गुऱ्हाळे सध्या बंद आहेत. 

मुंबईहून खेडला आलेल्या दोघांचे कोरोना रिपोर्ट...  

पुणे जिल्ह्यातच नव्हे; तर राज्यात सर्वाधिक गुऱ्हाळांचा तालुका म्हणून दौंड तालुक्‍याची चर्चा आहे. उसाची तोडणी करण्याचे काम परजिल्ह्यातील मजुरांकडून केले जाते. गुऱ्हाळ चालवण्याचे काम परप्रांतीयांकडून केले जाते. आता बहुतांश कामगार आपापल्या गावी गेल्याने 80 टक्‍क्‍यांहून अधिक गुऱ्हाळे बंद आहेत. गाळप हंगाम संपल्यामुळे तालुक्‍यातील खासगी साखर कारखानेही बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाची मागणी या काळात घटलेलीच असते. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परिणामी जी गुऱ्हाळे सुरू आहेत, ती उसाला कमी बाजारभाव देत आहेत. तसेच, उत्पादन कमी असल्याने गुळाला चांगला भाव मिळत आहे. जी गुऱ्हाळे सध्या सुरू आहेत, त्यांना चांगला नफा होत असल्याची चर्चा आहे. सर्व गुऱ्हाळेही सुरू असतात तेव्हा शेतकऱ्यांच्या उसाला मागणी आणि भावही चांगला असतो. शिवाय ऊसतोडणी व गुऱ्हाळ कामगारांच्या मोठ्या संख्येमुळे तालुक्‍यातील छोटेमोठे व्यवसाय दमदारपणे सुरू असता. त्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे तालुक्‍याचे एकूणच अर्थकारण अडचणीत आल्याची स्थिती आहे. 

नफ्याचे असे आहे गणित 

 • गुऱ्हाळांना ऊस पुरवणारे ठेकेदार शेतकऱ्यांकडून एक हजार आठशे ते दोन हजार रुपये प्रतिटन दराने ऊस खरेदी करतात 
 • तोडणी करून तो गुऱ्हाळ चालकांना दोन हजार आठशे रुपये प्रतिटन प्रमाणे देतात 
 • चांगल्या उसापासून प्रतिटन एकशे वीस ते एकशेचाळीस किलो गूळ उत्पादन 
 •  गुळाला सध्या घाऊक बाजारात 38 ते 39 रुपये प्रतिकिलो तर किरकोळ बाजारात 41 त 42 रुपये प्रतिकिलो भाव 
 • शेतकऱ्यांना एक टन उसाचे एक हजार आठशे रुपये मिळतात 
 • ठेकेदार ऊस तोडून वाहतूक करून त्याचे दोन हजार आठशे रुपये मिळवतो 
 • गुऱ्हाळ चालक गूळ बनवून त्याचे चार हजार रुपये मिळवतो 

दौंड तालुक्‍यातील स्थिती 

 • गुऱ्हाळांची संख्या पाचशेहून अधिक 
 • एका गुऱ्हाळासाठी तोडणी करणारे पंधरा ते वीस कामगार 
 • गुऱ्हाळ चालवण्यासाठी पंधरा ते वीस कामगार 
 • प्रत्येक गुऱ्हाळामागे सुमारे पस्तीस ते चाळीस लोकांना रोजगार 
 • गुऱ्हाळे पाचशे गृहीत धरली तर रोजगार अठरा ते वीस हजारांवर 

शाळांचे पट कमी होणार? 
ऊसतोडणी व गुऱ्हाळ कामगारांची मुले येथील शाळांमध्ये प्रविष्ट केली जात असत. आता या कामगारांचे स्थलांतर झाल्याने त्याचा परिणाम येथील शाळांच्या पटावर नक्कीच होणार आहे. वाड्या वस्त्यांवरील दोन शिक्षकी शाळांची पटसंख्या या मुलांवर अवलंबून असते. अशा अनेक शाळांना आता आपला पट टिकवण्यात अडचणी येणार आहेत.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of sugarcane growers due to lockdown